आधी मुख्यमंत्री, पवारांना पत्र, तर उद्या राज ठाकरेंची नाणार प्रकल्पग्रस्तांशी चर्चा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या आशिया खंडातील सर्वांत मोठ्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पावरून कोकणात राजकारण जोरात सुरू झाले आहे. या रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून राज्याच्या दीर्घकालीन हिताचे निर्णय घ्या, असे आवाहन केले आहे.

तर दुसरीकडे राज ठाकरे नाणार प्रकल्पग्रस्तांना भेटणार आहे. राज ठाकरेंनी नाणार प्रकल्पग्रस्तांना ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी बोलवले आहे. उद्या कृष्णकुंजवर ही भेट होणार आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. नाणार प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. मात्र स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर जमीन मालकांचं म्हणणं ऐकण्यासाठी राज ठाकरे या प्रकल्पग्रस्तांना भेटणार आहे. नाणारमधील जमीन मालकांना राज ठाकरेंनी बैठकीचे निमंत्रण दिले आहे. या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे. राज ठाकरेंच्या निवासस्थानी ही भेट होणार आहे. उद्या सकाळी ११ वाजता ही भेट होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER