‘…तर हा संभाजी महाराज आडवा येईल !’ मराठा आरक्षणावरून संभाजीराजे कडाडले

Sambhaji Raje-Maratha Reservation

नाशिक : मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha reservation) भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी. मी त्यांची जबाबदारी घेतलेली नाही. भाजपने मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये, यावर तोडगा सांगावा, असे विधान खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी केले. गेल्या सरकारने बोगस कायदा केला की या सरकारने सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका व्यवस्थित मांडली नाही, याच्याशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही.

राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकमेकांवर केवळ ढकलाढकली करत आहेत. त्यामुळे आंदोलन काय असतं हे इतरांनी मला शिकवू नये. मराठा समाजाची दिशाभूल कराल तर हा संभाजी महाराज आडवा येईल, अशी संतप्त प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली.ते गुरुवारी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी मी माझा महाल सोडून राज्यभरात फिरत आहे. ही वेळ आक्रमक होण्याची नाही. प्लेगच्या साथीच्या वेळीही राजर्षी शाहू महाराजांनी असाच संयम राखला होता. आक्रमक भूमिका घ्यायला केवळ दोन मिनिटं लागतात.

आंदोलनाला काय लागतं, आता लगेच करू. पण त्यामध्ये कोणी मयत झाले तर त्याला जबाबदार कोण, शाहूंचा वंशज, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला. माझ्याकडे अनुभव असला तरी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असलेले अनेक जण आहेत. त्यांच्याशी चर्चा करून मी २७ तारखेला माझी भूमिका स्पष्ट करेन. एकदा मी पुढे गेलो तर मागे वळून बघणार नाही. मी २७ तारखेला मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांशीही यासंदर्भात चर्चा करणार आहे. या सगळ्यानंतर मी माझी भूमिका मांडेन तेव्हा मराठा आमदार आणि खासदारांनी माझं-तुझं केलं तर बघा, असा इशाराही संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.

या पत्रकार परिषदेत संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आंदोलनासाठी आग्रही असणाऱ्या भाजपचा चांगलाच समाचार घेतला. मी मराठा समाजाला दिशा देण्याचे काम करत आहे. राज्य किंवा केंद्र सरकार असो एकमेकांवर ढकलाढकली करत आहेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार वेळेला पत्र दिले. पण त्यांनी अद्याप भेटीसाठी वेळ दिलेली नाही. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी काहीच नाही केलं तर मराठा समाज काय भूमिका घेईल हे बघून घेईल, असा कडक इशाराही संभाजीराजे यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button