…तर देशाचं ऐक्य कसे टिकेल? शरद पवारांकडून धोक्याचे संकेत

Sharad Pawar

मुंबई : बाबरी मशीद (Babri Masjid)खटल्याचा निकाल आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष व तत्कालीन संरक्षण मंत्री शरद पवार (Sharad pawar) यांनी अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. ‘अयोध्येनंतर आता काशी, मथुरा अशीही चर्चा सध्या सुरू झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे देशाचे सामाजिक ऐक्य कसे टिकणार याची काळजी आम्हा सगळ्यांनाच वाटते आहे’, अशी चिंता व्यक्त करत शरद पवार यांनी भविष्यातील धोक्याचे संकेत दिले आहे. त्यांनी ट्वीटरच्या (Tweet)माध्यमातून ही चिंता व्यक्त केली.

बाबरी मशिदीच्या विध्वंसाची घटना घडली तेव्हा केंद्रात नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील सरकार होतं. त्या सरकारमध्ये शरद पवार संरक्षण मंत्री होते तर माधव गोडबोले तेव्हा केंद्रीय गृह सचिव होते. या प्रकरणात गोडबोले यांनी सखोल अभ्यास केला होता व पंतप्रधान नरसिंह राव यांना सल्लाही दिला होता. उत्तर प्रदेशातील कल्याण सिंह सरकार वास्तूला धक्का लागू देणार नाही, असं सांगत असलं तरी त्यावर विश्वास ठेवू नये, असे गोडबोले यांचे स्पष्ट मत होते. मात्र उत्तर प्रदेश सरकारवर आपण विश्वास ठेवला पाहिजे, अशी भूमिका पंतप्रधानांनी घेतली आणि दुर्दैवाने गोडबोले यांनी जी भीती व्यक्त केली होती तेच घडले, असे सांगत पवार यांनी आता काही महत्त्वाची विधाने केली आहेत.

बाबरी मशीद प्रकरणी निकालानंतर माधव गोडबोले यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याचा संदर्भ घेत पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. ‘बाबरी मशीद विध्वंस प्रकरणीच्या निकालाबाबत मी न्यायमूर्तींबद्दल काही बोलणार नाही’, असे पवार यांनी सुरुवातीला स्पष्ट केले व आपले परखड मत व्यक्त केले. ‘बाबरी निकालानंतर माधव गोडबोले यांचे विधान मी टीव्हीवर ऐकले. ‘सगळ्या प्रकारचे पुरावे याठिकाणी दिल्यानंतरही असा निर्णय होतो, याचं मला आश्चर्य वाटतं,’ हे उद्गार माधव गोडबोले यांचे होते. माधव गोडबोले तेव्हा केंद्रीय गृह सचिव असल्याने त्यांनी या प्रकरणाचा सखोल अभ्यास आधीच केला होता. नंतर काय होईल याचीही खात्री त्यांना होती व नंतर जे घडलं ते त्यांनी डोळ्याने पाहिलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाबाबत मनातली अस्वस्थता माध्यमांकडे नमूद केली त्याबद्दल मला आश्चर्य वाटलेलं नाही’, असे पवार म्हणाले.

शरद पवार यांनी अयोध्येत ज्या प्रमाणे मशीद पाडण्यात आली तसाच प्रकार काशी, मुथरेतही घडू शकतो अशी भीती स्पष्ट शब्दांत व्यक्त केली आहे. ‘आता काशी, मथुरा अशीही चर्चा सुरू झाल्याचे दिसते आहे. त्यामुळे देशाचे सामाजिक ऐक्य कसे टिकणार याची काळजी आम्हा सगळ्यांनाच वाटते आहे’, असा शब्दांत पवार यांनी भविष्यातील धोक्यांचे संकेत दिले.

ही बातमी पण वाचा : चंद्रकांत पाटलांनी साडेचार वर्षे वाट बघावी; आघाडी सरकार पाच वर्षे चालेल- शरद पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER