….तर मंदिरं खुली होतील

CM Uddhav Thackeray - Religious Places - Editorial

Shailendra Paranjapeअखेर मंदिरे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय आणि पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरातली मंदिरं खुली होताहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी निर्णय जाहीर करताना ही राज्य सरकारची नव्हे तर श्रींची इच्छा असल्याचे समजा, असे म्हटले आहे. करोनाच्या नरकासुराने धुमाकूळ घातलाय आणि करोना काळात डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉइज यांच्या रूपाने देव भक्तांची काळजी घेत होतेच पण आता ते देव मंदिरातूनही भेटणार आहेत, असंही ठाकरे यांनी म्हटलंय.

करोनाची दुसरी लाट येईल, असा अंदाज राज्याच्या आरोग्य विभागानं व्यक्त केलाय. तो करताना जगातल्या अनेक देशांमधे करोनाची दुसरी लाट येत असल्याचं लॉजिकही लावण्यात आलंय. त्यामुळे मंदिरं खुली करतानाही करोनाचे सर्व नियम पाळूनच मंदिरात दर्शनासाठी जाण्याचं आवाहन भक्तांना करण्यात आलंय.

कोणत्याही निर्णयाचं राजकारण नाही झालं तरच नवल, अशी सामाजिक राजकीय परिस्थिती सध्या आपण अनुभवतोय. त्यामुळे मंदिरे खुली करण्याच्या निर्णयावरूनही श्रेयवादाचे राजकारण सुरू झालेच. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या प्रयत्नामुळे मंदिरे खुली झाली असल्याचं सांगत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यक्रत्यांनी राज्याच्या काही भागात पेढे वाटून मंदिरे खुली करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. दुसरीकडे राज्यातले संत, त्यांचे वंशज, महाराज हे मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटले होते. राज ठाकरे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच मंदिरे खुली होताहेत, असा दावा करत मनसेच्या कार्यकर्त्यांनीही पेढे वाटलेत.

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्यातही मंदिरं खुली व्हावीत, ही मागणी पहिल्यापासून करणाऱ्या भारतीय जनता पक्षानं सरकारचे हा निर्णय म्हणजे देर आये, दुरुस्त आहे किंवा उशिरा सुचलेले शहाणपण आहे, असं म्हटलंय. भाजपानं हा निर्णय आधीच व्हायला हवा, असंही नमूद केलंय.

आता मंदिरं खुली होताहेत. भक्त देवाच्या दर्शनाला जातील आणि राज्यभरातल्या मंदिरांमधे, मंदिर परिसरात विविध प्रकारचे व्यवसाय करणाऱ्यांमधे उत्साहाचे वावरण पसरवतील. कारण स्वाभाविक आहे. मंदिरे खुली झाली की मंदिरांभोवतीचे अर्थकारणही तेजीत येईल. कोल्हापूर महालक्ष्मीसह तुळजापूर भवानी, मुंबईचा सिद्धीविनायक, पंढरपूरचा विठ्ठल, शिर्डीचे साईबाबा संस्थान, कोकणातले गणपतीपुळे देवस्थान, पुण्यातले ग्रामदैवत कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी तसेच दगडूशेठ हलवाई गणपती, दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर, सारसबागेतले देवदेवेश्वर संस्थानचे गणपती मंदिर यासह बहुतांश मंदिरं आणि इतर धर्मीयांची देवस्थाने, प्रार्थनास्थळेही पाडव्यापासून खुली होताहेत. त्यातून अंतिमतः राज्याच्याच अर्थचक्राला गती मिळणार आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती असो की सज्जनगड, राज्यातल्या विविध देवस्थानांमधले काही ना काही वाद निर्णयासाठी प्रलंबित आहेत. गेली अनेक वर्षे काही देवस्थानच्या विश्वस्त मंडळांवर राजकीय मंडळींच्या नेमणुका केल्या जाऊ लागल्यात. त्याशिवाय एकूणच सरकारचे उत्पन्नाचे स्त्रोत घटत चालले असताना विविध देवस्थानांच्या कमाईवर डोळा ठेवला जाऊ लागलाय.

मंदिरं उघडतील, भक्त गर्दी करतील आणि करोना वाढेल, ही भाती मुख्यमंत्र्यांना वाटतेय. पण लोकशाहीच्या मंदिरात राज्य सरकार, महापालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था यांमधे सगेसोयरे, लागेबांधे असलेले अशांची बेसुमार भरती करत या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकारच्या विविध यंत्रणा आर्थिक डबघाईला आल्या आहेत. पगारावर ७० ते ८० टक्के पैसा गेल्यानंतर विकासाला पैसाच उरत नाही, ही अवस्था आहे. त्यात भ्रष्टाचारामुळे एकाच रस्त्यावर अनेकदा केवळ वरवरची रंगसफेती करत डांबराचे थर चढवून प्रामाणिक करदात्यांच्या पैशांवर डल्ला मारला जातो.

मंदिरं उघडताना करोना पसरण्याची जी भीती व्यक्त केली जातेय तीच लोकशाहीतल्या या सर्व मंदिरांमधे शिस्त, नियम, पारदर्शकता, भ्रष्टाचारमुक्तता आणली तर सरकारला मंदिरे, देवस्थानचे ट्रस्ट यांच्या उत्पन्नांकडे बघण्याची वेळ येणार नाही. मंदिरं खुली करतानाच मंदिरांच्या अर्थकारणावर ताबा मिळवण्याची स्वप्न बघण्याचे जरी राजकारण्यांनी थांबवले तरी देव राज्याला पावेल. त्याबरोबरच देवाच्या पुण्याईवर मूठभर विश्वस्त, त्यांचे बगलबच्चे यांनी केलेल्या गैरप्रकारांमुळे देवस्थाने बदनाम होणार नाहीत, याची काळजी घेणं, हीदेखील भक्तांची जबाबदारी आहे, याचं भान सश्रद्ध मंडळींना आलं तरी मंदिरं खऱ्या अर्थानं खुली झाल्यासारखं होईल.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER