…तर विज्ञान दिन साजरा होईल

National Science Day

Shailendra Paranjapeराष्ट्रीय विज्ञान दिन २८ फेब्रुवारीला साजरा केला जातो. भारतीय संशोधक चंद्रशेखर व्यंकट रामन यांनी केलेल्या संशोधनासाठी त्यांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांनी लावलेल्या शोधामुळे आभाळ निळे का दिसते, याचं आकलन नेमकेपणामुळे झालं. त्या रामन परिणामाच्या शोधानिमित्त  राष्ट्रीय पातळीवर १९८७ पासून २८ फेब्रुवारीला विज्ञान दिन साजरा केला जातो. शाळा, महाविद्यालये, संशोधन संस्था आणि वैज्ञानिक संस्थांमधून निबंध स्पर्धा, व्याख्याने, वक्त्व स्पर्धा आदींद्वारे विज्ञान दिन साजरा करतानाच समाजात विज्ञानाचा प्रसार होण्यासाठीचे विविध उपक्रम राबवले जातात.

विज्ञान-तंत्रज्ञानाचे भारतातले भवितव्य आणि त्याचा कौशल्य शिक्षण आणि रोजच्या व्यवहारातले काम या सर्वांवर होणारा परिणाम, ही यंदाच्या  राष्ट्रीय विज्ञान दिनाची मुख्य संकल्पना आहे. विज्ञान-तंत्रज्ञानानं जग बदललं आहे आणि जवळह आणलं आहे पण ते होतानाच विज्ञान-तंत्रज्ञानाकडे कोणालाही पाठ फिरवून सुलभतेने जगता येणार नाही, अशी अपरिहार्यता या विषयाला प्राप्त झाली आहे.

प्राचीन काळापासून आपल्या देशात असलेली गुरुकुल पद्धती जाऊन सध्याची शिक्षणपद्धती आलेली आहे. मुख्यत्वे ब्रिटिश काळापासून आलेल्या या शिक्षणपद्धतीमधे लॉर्ड मेकॉले यांनी एतद्देशीयांना शिक्षण मिळेल हे पाहतानाच ब्रिटिश राजवटीसाठी कारकून तयार करण्याचा कारखानाच सुरू केला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही आपण ही तरुणांना केवळ पदवीधारक बनवणारी शिक्षणपद्धती चालू ठेवली. हळूहळू त्यातून कागदी डिग्र्या मिरवणारे आणि प्रत्यक्ष जीवनव्यवहारात कुचकामी असणारे तरुण तयार होण्यात त्याची परिणती झाली.

विज्ञान दिनाच्या निमित्ताने मुळात विज्ञानाने काय साध्य होऊ शकते, याचा विचार करायला हवा. विज्ञान म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचे तर मनुष्याला आपल्या आजूबाजूच्या सर्व गोष्टींचे ज्ञान आकलन होणे आणि त्याद्वारे त्याचे जगणे अधिक सोपे होणे. त्यासाठी अवतीभोवती असलेल्या गोष्टी तसेच घडणाऱ्या गोष्टींचे आकलन करून घेणे, त्यासाठी अभ्यास, अध्ययन करणे या साऱ्या बाबींचा अंतर्भाव विज्ञानशिक्षणात असायला हवा. आपल्या आजवरच्या विज्ञान शिक्षणात घोकंपट्टीवर भर देणं, त्यातून परीक्षेत गुण मिळवणे आणि पदवी मिळवून एखादी कायम म्हणजे पर्मनंट नोकरी मिळवणे, इतकाच काय तो उद्देश राहू लागला. मग अशा शिक्षणपद्धतीत एडिसनने दिव्याचा शोध लावला, ही गोष्ट शालेय जीवनात केवळ एक मार्काचा प्रश्न यापुरतीच उरते. त्यामुळे एडिसन एक मार्काला असतो. शिक्षण पद्धतीत असलेल्या या दोषामुळे पूर्वी कधी तरी शाळेतल्या मुलाला प्रश्न विचारल्यावर त्याने, मी पसायदान ऑप्शनला टाकले होते, असे उत्तर दिल्याचा किस्सा आमच्या लहानपणी सांगितला जायचा. पण त्या किश्श्याचा संदर्भ शिक्षणपद्धतीतला फोलपणा दाखवण्याचाच असायचा.

विज्ञान शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होणं, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींबाबत तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करणं, अवैज्ञानिक गोष्टी न स्वीकारणं, हे सारं अभिप्रेत आहे. सध्याच्या काळात व्हाट्स अप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून काहीही तोशिस न करता बोटं दाबली की सहजी मिळणाऱ्या माहितीवर लगेच विश्वास ठेवणं, हेदेखील अवैज्ञानिकच ठरतं. त्यामुळे माहितीची सत्यासत्यात न पडताळता ती तशीच पुढे पाठवणं किंवा फॉरवर्ड करणं, हे सायबर कायद्यानुसार गुन्हा ठरून अंगलटही येऊ शकतं. नो एंट्रीचा फलक मला दिसला नाही किंवा मला अमुकतमुक कायदा माहिती नाही, हा निरागसपणा किंवा इनोसन्स किंवा इग्नरन्स कायद्यात चालत नाही. कायद्याने अशा प्रसंगी आपण गुन्हेगारच ठरतो. त्याच धर्तीवर मिळेल ती माहिती सरळ फॉरवर्ड करून देणंही आपल्या फारसं हिताचं नाही. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी किमान मला ज्याची खात्री नाही, ती पोस्ट मी पुढे पाठवणार नाही, हा संकल्प करायला हवा.

विज्ञानाचे शिक्षण देताना मुलांमधे वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हावा, याची खात्री करून घ्यायला हवी. त्यासाठी विज्ञान पदवीधर किंवा अभियांत्रिकी पदवीधर आणि साधी साधी घरगुती यंत्रदुरुस्ती किंवा बिघडलेल्या गोष्टींसाठी बोलवा मेकँनिकला, हे त्या शिक्षणाचा पराभव मानले जायला हवे. त्यासाठी औपारिक शिक्षणासह स्किलसेट किंवा जीवनकौशल्ये शिकवायला हवीत. त्याच उद्देशाने केंद्र सरकारने शिक्षण पद्धतीत काही बदल केले आहेत. त्यासाठी नवे धोरणही आणले आहे. त्याचा केवळ राजकीय कारणांसाठी विरोध न करता लोकनियुक्त सरकारने केलेले बदल म्हणून त्याके बघून त्यावर रचनात्मक टीका झाली तर ती देशहितकारक होईल. त्यातून विज्ञान पदवीधर तयार होताना त्यांनी शिकलेल्या गोष्टींचे व्यवहारात उपयोजन करता येणे आवश्यक आहे. तसेच मूलभूत संशोधनात मोलाचं योगदान करू शकतील, असे वैज्ञानिक तयार होणं, हीदेखील विज्ञानशिक्षणाची अंतिम लक्ष्ये असायला हवीत. तसे शिक्षण नव्या पिढीला मिळो आणि देशाचा दृष्टिकोन वैज्ञानिक होवो, हीच विज्ञान दिनाची शुभेच्छा.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER