…तर अख्खे मंत्रालय पेटवून देऊ; अखिल भारतीय मराठा महासंघाचा इशारा

Maratha Reservation

जालना : सरकार त्यांचा भ्रष्टाचार दडपण्यासाठी मंत्रालयाचा एक मजला जाळू शकते तर आरक्षणाचा प्रश्न तत्काळ मार्गी न लावल्यास मराठा समाज अख्खे  मंत्रालय पेटवू शकतो, असा जळजळीत इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे (All India Maratha Federation) जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख (Arvind Deshmukh) यांनी दिला आहे. ते म्हणाले, आधीच्या सरकारचे धोरण म्हणजे शेतकऱ्याचं  मरण होतं  तर आताच्या सरकारचं  धोरण मराठ्यांच्या मुलाचं मरण, असं  आहे.

मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागेपर्यंत शाळा, महाविद्यालय प्रवेशासह नोकर भरती करू नका, अशी मागणी अरविंद देशमुख यांनी केली आहे. दरम्यान, ‘मराठा ठोक मोर्चा’ने शनिवारी ‘पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश मोर्चा’ काढला. नामदेव पायरीचे दर्शन घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून सकल मराठा समाजाच्या पायी दिंडीला सुरुवात झाली. पंढरपुरातून पायी मराठा कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

पंढरपूर पोलीस मुख्यालयासमोर मराठ्यांचा आक्रोश मोर्चा अडवण्यात आला. पोलीस मराठा कार्यकर्त्यांना धरपकड करण्याच्या तयारीत असल्याने वातावरण तापलं  आहे. पोलीस आणि मराठा समन्वयकामध्ये बोलणी सुरू असल्याची माहिती आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात संचारबंदी लागू केली आहे.

समन्वयकांना घेतले ताब्यात
पंढरपूर पोलिसांनी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांना ताब्यात घेतलं असून त्यांना पुण्याच्या दिशेनं नेण्यात आलं आहे. पायी दिंडीला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. १० खासगी वाहनांतून पोलीस बंदोबस्तात मराठा समन्वयक पुण्यामध्ये पोहचतील. त्यानंतर पुण्यात मुख्य सचिवांसोबत बैठक होईल, अशी माहिती आहे.

ड्रोनने नजर ठेवली जाईल. पंढरपूरकडे निघालेल्या मराठा तरुणांना पोलिसांनी अडवलं. १४४ कलम लागू असल्याने त्यांना पंढरपुरात जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला. कळंब पोलिसांनी आंदोलकांना नजरकैदेत ठेवलं आहे. १४९ नुसार १२ कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER