…तर बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या लाखों कर्मचा-यांचे संसार वाचले असते : धनंजय मुंडे

Dhananjay Munde

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या एमटीएनएल, बीएसएनएलला लवकरच टाळे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. बीएसएनएल, एमटीएनएल आर्थिक संकटात सापडल्या आहेत. लाखो कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याचा घाट सरकारने घातला आहे. सरकारने जिओवर जितकं प्रेम दाखवले त्यातले अर्धे प्रेम बीएसएनएल आणि एमटीएनएलवर दाखवले असते तर लाखो कर्मचाऱ्यांचे संसार वाचले असते, असेही ते म्हणाले.

सरकारी मालकीच्या एमटीएनएल, बीएसएनएलला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी दूरसंचार विभागाने अर्थ मंत्रालयाला प्रस्ताव दिला होता. सरकारी मालकीच्या कंपन्या असलेल्या एमटीएनएल, बीएसएनएल आर्थिक संकटात आहेत. त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी दूरसंचार विभागाने अर्थ मंत्रालयाकडे 74 हजार कोटींची मागणी केली होती. या दोन्ही कंपन्यांवर सध्या 95 हजार कोटींचा अर्थभार आहे.

या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना अन्यत्र सामावून घेण्याची तयारी सरकारने दाखवली आहे. बीएसएनएल, एमटीएनएलमध्ये तीन प्रकारचे कर्मचारी आहेत. यातील पहिला वर्ग कंपनीकडून थेट नियुक्ती झालेल्यांचा आहे. तर दुसऱ्या प्रकारातील कर्मचारी दुसऱ्या पीएसयू किंवा विभागांमधून बीएसएनएल, एमटीएनएलमध्ये आले आहेत. तिसऱ्या प्रकारातील कर्मचारी भारतीय दूरसंचार सेवेतील आहेत. तिसऱ्या वर्गातील अनेकजण सध्या अधिकारी पदावर कार्यरत आहेत.या दोन्ही कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची संख्या 1.65 लाखांपेक्षा जास्त आहे. दोन्ही कंपन्यांच्या एकत्रीकरणाचा प्रस्तावदेखील बारगळला आहे.