निर्भया प्रकरण; तेव्हा मी अज्ञान होतो ! दोषी पवन कुमारची सुप्रीम कोर्टात धाव

नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाचा गुन्हा घडला तेव्हा मी अज्ञान (अल्पवयीन ) होतो असा दावा करणारी स्पेशल लीव पीटीशन (एसएलपी) या प्रकरणातील एक आरोपी पवन कुमार गुप्ता याने आता सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. दोषी पवन कुमारने हायकोर्टाच्या १९ डिसेंबरच्या आदेशाला आव्हान दिलं आहे. या आदेशात हायकोर्टाने बनावट कागदपत्र जमा केल्याबद्दल आणि न्यायालयात हजर न राहिल्याबद्दल त्याच्या वकिलावर ताशेरे ओढले होते.

या प्रकरणातील दुसरा आरोपी मुकेश याच्या दयेचा अर्ज आज (शुक्रवारी) राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर या सर्व दोषींच्या फाशीवर दिल्ली हायकोर्टाने शिक्कामोर्तब केलं आहे. त्यांना १ फेब्रुवारीला पहाटे सहा वाजता फाशी दिली जाणार आहे. त्याबाबतचा डेथ वॉरंटही शुक्रवारी नव्याने जारी करण्यात आला आहे. कायद्याच्या अभ्यासकांच्या मते पवनलादेखील सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळणार नाही.

दिल्ली हायकोर्टाने पवनची अल्पवयीन असल्याचा दावा करणारी याचिका फेटाळून लावली होती. एवढेच नाही तर पवनचे वकील ए. पी. सिंह यांना २५ हजार रुपये दंडही थोटवला होता. पवन कुमारने दिल्ली हायकोर्टात याचिका करत दावा केला होता की डिसेंबर २०१२ ला जेव्हा घटना घडली तेव्हा त्याचं वय १८ वर्षांपेक्षा कमी होतं.