…तर भाजपला १५० पेक्षा अधिक जागा मिळाल्या असत्या! – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

मुंबई :- मागच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती केली ही एकच गोष्ट आमच्याकडून चुकली, भाऊ तारसेकरांच ऐकलं असतं तर एकट्या भाजपला १५० पेक्षा अधिक जागा मिळाल्या असत्या, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहाच्या व्हर्च्युअल रॅलीत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, भाऊ तोरसेकर यांनी २०१३ मध्येच सांगितले होते की भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी निवडलं तर संपूर्ण बहुमत म्हणजेच २७२ पेक्षा अधिक जागा भाजपला मिळतील. त्यावेळी अनेकांना हे जरा जास्त सांगत आहेत असं वाटलं, पण ते खर ठरलं. २०१९ मध्ये देखील देशात अस्थिरतेचं वातावरण होतं. बिहार आणि दिल्लीसारखी एखादी निवडणूक हरलो होतो. अशावेळी अनेकांना वाटत होतं नकारात्मक वातावरण आहे. अनेक पक्ष एकत्र झाले होते. त्यावेळी देखील भाऊ तोरसेकर यांनी भाजपला ३०० पेक्षा अधिक जागा मिळतील असं सांगितलं होतं. ते देखील सत्य झालेलं आपण बघितलं.

खरं म्हणजे एकच गोष्ट आपली चुकली. भाऊ तोरसेकर यांनी विधानसभेच्या आधी एक पुस्तक लिहिलं होतं. त्यात त्यांनी भाजपला पर्याय दिले होते. भाजप १५० प्लस किंवा युती २०० प्लस त्यावेळी आपण युतीचा पर्याय निवडला. तो पर्याय स्वीकारला नसता तर भाऊ तोरसेकर यांचं तिसरं भाकित देखील खरं ठरलं असतं, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंहांच्या काळात देश रसातळाला गेला. मनमोहन सिंह सज्जन व्यक्ती होते मात्र त्यांचं सरकारवर काहीही नियंत्रण नव्हतं. त्यावेळी प्रत्येक मंत्री स्वत:ला पंतप्रधान समजत होता, मात्र पंतप्रधान स्वत:ला पंतप्रधान समजत नव्हते, अशी टीका फडणवीस यांनी केली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशातील भ्रष्टाचार कमी झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचाराची लढाई सुरु केली आणि ना खाऊंगा न खाने दुंगा हा मार्ग अवलंबला. नरेंद्र मोदींनी दिल्लीतील प्रस्थापित भ्रष्ट व्यवस्थेला आव्हान दिलं आणि ती मोडीत काढली. व्यवस्था नुसती मोडीत नाही काढली तर नवी व्यवस्थाही त्यांनी उभी केली. आता दिल्लीत मंत्रालयात कुणाची लाच मागण्याची हिंमत होत नाही. कोरोना काळात महाराष्ट्रात मंत्रालयात शुकशुकाट होता, मात्र दिल्लीत मंत्रालय सुरु होतं, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची स्तुती करताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची तुलना स्वामी विवेकानंद यांच्याशी केली. मोदीची स्वामी विवेकानंदांच्या विचाराने प्रेरित झाले. त्यानंतर मोदीजींनी स्वयंसेवक होऊन देशसेवा सुरु केली. नरेंद्र मोदींचं एकूण व्यक्तीमत्त्व पाहिलं तर त्यात स्वामी विवेकानंदांची झलक त्यांच्यात दिसते. स्वामी विवेकानंदांप्रमाणे योद्धा संन्यासी होऊन मोदीजी जीवन जगत आहेत. गरीब कल्याणाचा एक मोठा कार्यक्रम मा. मोदीजी यांनी हाती घेतला. प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत योजना, जनधन अशा अनेक योजनांतून त्यांनी अर्थव्यवस्थेत गरिबांना सामावून घेतले आणि भारत ११ व्या क्रमांकावरून जगातील पहिल्या ५ अर्थव्यवस्थेत आला. ही त्यांची दूरदृष्टी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER