पक्षांतर्गत वादातून जलील यांच्याकडून परस्पर ही भूमिका जाहीर : वंचित बहुजन आघाडी

Owaisi-Jalil

पुणे : ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत अजूनही जागावाटपाची चर्चा सुरू असताना खासदार इम्तियाज जलील यांनी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता ओवेसींसाठी जलील म्हणजे ‘नाकापेक्षा मोती जड’ अशी स्थिती झाली आहे. त्यांच्या पक्षातील अंतर्गत वादातून जलील यांनी परस्पर ही भूमिका जाहीर केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ता सचिन माळी यांनी केला आहे.

जागावाटपाबाबत माळी म्हणाले, एमआयएमकडून अधिकृतपणे केवळ १७ जागांचा प्रस्ताव आला होता. तर दुसरीकडे जलील यांनी आघाडीकडून एमआयएमला केवळ सात जागा मिळत असल्याने शुक्रवारी आघाडी तुटल्याचे जाहीर केले.

यापूर्वी कधीही १०० जागांचा प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या जागांविषयी चर्चा झालेली नाही. परंतु जलील यांनी त्यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी स्वत:च्या लेटर हेडवर आघाडीतून बाहेर पडल्याचे जाहीर केले आहे. जलील यांची भूमिका म्हणजे एमआयएमची भूमिका नसल्याचे माळी म्हणाले. प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांच्या पातळीवर अजून जागावाटपाची चर्चा सुरू आहे. दोघांमध्ये चांगला समन्वय आहे. मुस्लिमांसह सर्व समाजाला योग्य पद्धतीने प्रतिनिधित्व दिले जाणार आहे. पण जलील यांच्याकडून फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे माळी म्हणाले.