पवईमध्ये कस्टम अधिकार्‍याचा मोबाईल चोरी

mobile chore

मुंबई : बसमध्ये चढताना असलेल्या गर्दीचा फायदा उठवत चोरट्याने कस्टम विभागातील एका अधिकार्‍याचा मोबाईल लंपास केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पवईमध्ये घडली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करुन पवई पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

भांडूप पूर्व परिसरात राहात असलेले 42 वर्षीय तक्रारदार हे कस्टम विभागात निरीक्षक असून सध्या ते मुंबई विमानतळावर कर्तव्य बजावत आहेत. 10 तारेखालाच त्यांनी आपल्या वापरासाठी नवीन मोबाईल खरेदी केला होता. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांनी पवई तलाव बस थांब्यावरुन भांडूपला जाण्यासाठी बस पकडली. बसमध्ये चढण्यापूर्वी पॅन्टच्या खिशात असलेला मोबाईल बसमध्ये चढल्यानंतर त्यांच्या खिशामध्ये नव्हता.

बसमध्ये सर्वत्र शोध घेऊनही मोबाईल न सापडल्याने बसमध्ये चढताना असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने मोबाईल चोरी केल्याची त्यांची खात्री पटली. अखेर त्यांनी पवई पोलीस ठाणे गाठून मोबाईल चोरीची तक्रार दिली. या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.