पंकजाच्या कारखाऩ्यात चोरी ; राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचा पती निघाला चोर

Pankaja Munde

बीड : माजी मंत्री, भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे वर्चस्व असलेला वैद्यनाथ कारखान्यात चोरी झाल्याच्या बातमीने कळबळ उडाली आहे. या चोरीची पोलीसांत तक्रार दिल्यानंतर हे प्रकरण माध्यमांत गाजले. त्यानंतर आता चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे चोरी करणा-यामध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचा पती चोर निघाला आहे. अजीज इस्माईल शेख उर्फ मंगलदादा असं आरोपीचं नाव आहे. त्याच्यावर या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अजीज शेख सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सध्या पोलिसांनी अजीज शेखच्या मुलाला ताब्यात घेतलं आहे.

बीडमधील वैद्यनाथ साखर कारखान्यात मोठी चोरी झाल्याचं प्रकरण दोन दिवसांपासून माध्यमांत गाजतंय. या कारखान्यातून जवळपास 38 लाखांचं साहित्य चोरीला गेलंय. चोरट्यांनी कारखान्याच्या स्टोअर गोडाऊन आणि वर्कशॉपमधून तब्बल 37 लाख 84 हजारांचं साहित्य लंपास केल्याची तक्रार परळी ग्रामीण पोलिसांकडे 22 डिसेंबर रोजी देण्यात आली होती. त्यानंतर परळी पोलिसांकडून याबाबत गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला. या चोरी प्रकरणात परळी पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात स्टोअर गोडाऊन आणि एक वर्कशॉप गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये 17 ऑक्टोबर 2020 ला चोरी झाली. त्याची माहिती स्टोअर किपर जी.टी. मुंडे यांच्याकडून कारखान्याचे लिपिक आणि लीगल इन्चार्ज जमीन शेख यांना कळवण्यात आली. त्यानंतर लिपिक आणि लीगल इन्चार्ज यांनी चोरीच्या ठिकाणाची पाहणी केली. त्यावेळी स्टोअर आणि वर्कशॉपच्या मागील बाजूचं शटर उचकटल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मात्र, याबाबत कारखाना प्रशासनाकडून 22 डिसेंबरला तक्रार दाखल करण्यात आली. याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

या घटनेत एकूण 37 लाख 84 हजार रुपयांचं साहित्य लंपास करण्यात आलं आहे. त्यात कारखान्याचे संगणक, कपर मटेरियल, मिल बेअरिंग, बुश साऊंड बार अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे. या प्रकरणात 22 डिसेंबर रोजी परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा तपासाला सुरुवात केली. त्यानंतर अखेर पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतलं असून, त्यांच्याकडे कसून चौकशी केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER