रंगभूमी दिनाचे शुभवर्तमान…

Marathi Ranga Bhumi

Shailendra Paranjapeमराठी रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला साजरा केला जातो. याच दिवशी १८४३ साली विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर हा पहिला नाट्यप्रयोग सादर केला होता. या घटनेला शंभर वर्षे पूर्ण होताना पाच ते सात नोव्हेंबर १९४३ या तीन दिवसात सांगलीमधे शताब्दी महोत्सव करण्यात आला. त्यानिमित्त ५ नोव्हेंबर १९४३ ला नाट्य संमेलन घेण्यात आले. या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे राष्ट्रभक्त नाटककार, कवी होते.

करोनाच्या सात साडे-सात महिन्यांच्या खंडानंतर राज्य सरकारने चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मराठी रंगभूमीदिनाच्या पूर्वसंध्येला आणि दिवाळीच्या आगमनाच्या आठवड्यात हे आणखी एक शुभवर्तमान आहे. पुण्यातल्या भरत नाट्य संशोधन मंदिराच्या नाट्यगृहामधे रीतसर घंटा वाजवून पडदा वर गेला आणि संगीत नाटकांमधल्या नांदीचं सादरीकरण केलं गेलं. बालगंधर्व युगाची आठवण करून देणाऱ्या विविध संगीत नाटकांमधली नांदी एकापाठोपाठ सादर झाली आणि दिवाळीला पहाट पाडव्याचे कार्यक्रम होऊ शकतील, याचीही खात्री पटली.

आंतरजिल्हा एसटी प्रवाससेवा सुरू झाली, ग्रंथालये सुरू झाली, जिम सुरू झाल्या, क्रीडांगणे सुरू झाली, हॉटेल्स आणि बारही सुरू झाले पण सिनेमागृहे नाट्यगृहे काही सुरू होत नव्हती. तेव्हा चित्रपटगृह मालक-चालकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन व्यवसाय सुरू करायला परवानगी द्यावी, ही मागणी केली होती.

प्रमाणित कार्यप्रणाली किंवा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार करून ही परवानगी दिली जाईल, असं सरकारनं स्पष्ट केलं होतं. त्यानुसार आता नाट्यचित्ररसिकांची चित्रपटगृह मालक-चालकांची प्रतीक्षा संपली आहे. कोविड-१९चे सारे नियम पाळून म्हणजेच मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे निकष पाळून नाट्यगृहे चित्रपटगृहे आता सुरू होतील.

या क्षेत्राशी संबंधित एका बैठकीत परवडणारी चित्रपटगृहे उभारण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. करोना संकटामुळे सर्वच क्षेत्रात आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. राज्यातल्या बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्नाचे स्त्रोत घटले आहेत. त्यात वेतनासह नैमित्तिक खर्चाची तरतूद करणं, वेळ भागवणं अवघड जाऊ लागलंय. त्यामुळे केंद्र सरकारच्या आर्थिक पॅकेजसारखीच मदत राज्य सरकारनं या सर्व संस्थांना करायला हवी.

राज्य सरकारसह सर्वच सरकारी आस्थापनांना आर्थिक चणचण जाणवत असताना आश्वासनं देणं सर्वात पहिल्यांदा थांबायला हवं. दुसरं असं की थिएटर्स उभारणं हे सरकारचं काम आहे का, याचा विचार करायला हवा. संगीत नाटक असो की रंगभूमी, ती जिवंत ठेवणं हे त्या त्या क्षेत्रातल्या धुरिणांवर सोडायला हवं. सरकारी मदत, राजाश्रय, अनुदानं असल्या गोष्टींची सवय आधीच लागलेली आहे. ती लवकरात लवकर भूतकाळात जमा होईल, हे बघायला हवं.

सर्व क्षेत्रांनी आपल्या पायावर उभं राहणं सर्वात उत्तम. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांवर करोनाचे संकट, सावट आहे. त्यातून पुन्हा उभारी घेण्यासाठी पोषक सरकारी धोरणं असावीत, जाचक तरतुदी काढणं, अडवणूक करणारी धोरणं बदलणं, हे समजू शकते. पण प्रत्येक क्षेत्रानं सरकारकडे मदतीची याचा करणं हे काही योग्य नाही. त्याबरोबरच परवडणारी थिएटर उभारायला सरकारनं पुढाकार घेणं, हेही योग्य नाही कारण सर्वच घटकांनी मुळातलं आपलं काम म्हणजे सरकारी भाषेत विहित जबाबदारी चोख पार पाडली, तर कुणापुढेच हात पसरायची वेळ येणार नाही.

करोनानं अखिल विश्वापुढं संकट उभं केलं, अनेक आव्हानं त्यातून पुढे आली. करोनावर मात करून जग पुढे जाईलच. महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर मिशन बिगिन अगेन मधे सारी क्षेत्रं खुली होताहेत तसंच खऱ्या अर्थानं सारी क्षेत्रं आत्मनिर्भर करणं, हीच खरी करोनावरची मात असेल. राज्य सरकार, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी अनावश्यक खर्च टाळण्यावर भर दिला आणि वेळ-साधने-नैसर्गिक संपदा यासह मनुष्यबळाचा अपव्यय टाळला तरी खूप भरीव योगदान राज्याच्या देशाच्या अर्थचक्राला देता येईल.

नाटक-चित्रपट क्षेत्रं पुन्हा मोकळा श्वास घेतंय. या दोन्ही क्षेत्रात केवळ घराणेशाहीनं किंवा वशिल्यानं कोणाला कलाकार किंवा निर्माता, दिग्दर्शक किंवा गायक वा वादकही होता येत नाही. अंगात गुण असले तरच माणसं या क्षेत्रांमधे टिकतात, नाव मिळवू शकतात. तसंच राजकारणातही होवो, ही नटेश्वराला प्रार्थना.

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER