रंगभूमीचे मिशन बिगिन अगेन…

Shailendra Paranjapeपुणे तिथे काय उणे, असं म्हटलं जातं. ते खरंही आहे. शहर पुणे – विद्येचं माहेरघर, विद्वानांचं शहर, माहिती-तंत्रज्ञानाचं शहर, अटोमोबाईलचं शहर, सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावतो ते पुण्यातून मिळालेल्या शिदोरीच्या जिवावरच. अलीकडच्या काळात स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनाचं शहर. हवापाण्याच्या शुद्धतेमुळं पेन्शनरांचं शहर आणि चित्रविचित्र नावांच्या मंदिरांमुळे तसंच दुकानात मालाइतक्याचं पाट्या लावून ग्राहकांना शिस्त लावण्याच्या वृत्तीमुळं पुणेरी पाट्यांमुळे सोशल मिडियावरून (Social Media) जगभर गाजणारं पुणे शहर.

पुण्याला सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखलं जातं. बालगंधर्वांपासून ते अगदी आजच्या आघाडीच्या नटमंडळींना, गायकांना, कलावंतांना पुण्यात प्रेश्रकांची, रसिकांची टाळी मिळाली की होणारा आनंद अन्य शहरात होत नाही, असं अनेक मोठे कलावंत सांगतात. कारण पुण्यात कानसेन आहेत, रसिक आहेत, चोखंदळ आहेत. करावंताच्या मोठेपणाचा मुलाहिजा न बाळगता पु ल देशपांडे यांच्या अंतू बर्व्याप्रमाणे चोख प्रतिक्रिया देणारा हा रसिक आहे.

पुण्यामधे तीन मोठे अभिनेते बुधवारी एकत्र आले होते आणि ते तिघेही रंगमंचावर आठ महिन्यांनी आले होते. निमित्त होते ते अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेच्या वतीनं दिल्या गेलेल्या यशवंत वेणू पुस्काराचे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या आणि त्यांच्या पत्नी वेमुताई यांच्या स्मृत्यर्थ दिला जाणारा हा पुरस्कार अभिनेते मोहन जोशी आणि त्यांच्या पत्नी ज्योती जोशी यांना देण्यात आला.

विक्रम गोखले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनेते प्रशांत दामले हेही यावेळी उपस्थित होते. कोथरूड शाखेचे सर्वेसर्वा सुनील महाजन यांच्या पुढाकाराने हा  कार्यक्रम आयोजित केला गेला होता. कलाकार रसिकांचे ऋणानुबंध पुन्हा जुळावेत, अशी अपेक्षा विक्रम गोखले यांनी यावेळी व्यक्त केली.

संत ज्ञानेश्वरांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत सर्वच महात्म्यांनी समाजाला जागृतीची वाट दाखवली ती पुण्यातून. करोनाच्या (Corona) महासंकटातूनही जीवनाच्या विविध क्षेत्रात सरकारच्या वतीनं मिशन बिगिन अगेन सुरू केले गेले आहे. त्यामधेही अर्थातच पुणे शहर आपल्या लौकिकानिशी आणि ताकदीनिशी योगदान करतच आहे. त्यामुळे मिशन बिगिन अगेनही यशस्वी होईलच, पण देशाचा राज्याचा अर्थचक्राचा गाडा रुळावर आला म्हणजे सगळं काही मिळवलं असं होणार नाही. माणसाला जगायला पैसा लागतो पण का आणि कसं जगायचं ते कला शिकवते, संस्कृती शिकवते. त्यामुळे राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातूनच सांस्कृतिकतेचं मिशन बिगिन अगेनही सुरू होईल, यात शंका नाही.

आपल्याला उत्तम बालपण, उत्तम संस्कार, उत्तम नाटके, उत्तम मित्र, उत्तम आयुष्य मला पुण्याने दिले, असं सत्कारमूर्ती अभिनेते मोहन जोशी यांनी सांगितलं. मोहन जोशी यांना जीवनात उत्कृष्ट जीवनसाथी ज्योती जोशीही पुण्यातूनच लाभल्या आहेत.

प्रशांत दामले यांनी सैय्या बोलो तनिक मोसे, ही ठुमरी सादर केली आणि रसिकांची दाद मिळवली. अभिनय क्षेत्रातले ही रंगभूमीवरचे तिघेही आघाडीचे नट बुधवारी रंगमंचावर एकत्र आले आणि आठ महिनांनी रसिकांसमोर येताना वेगळाच आनंद होतोय, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

पुण्यातून सुरू होतं ते जग स्वीकारतं, एकीकडे पारतंत्र्याच्या काळोखातून स्वराज्याचं स्वप्न शिवाजी महाराजांनी पुण्यातूनच प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली. करोनाच्या अंधःकारातून प्रकाशाकडे झेपावत रंगभूमी बुधवारी पुन्हा उजळून निघाली ती या तीन मोठ्या नटांमुळे आणि आता हा प्रकाशझोत साऱ्या महाराष्ट्रभर पसरेल, यात शंका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER