बलात्काराच्या खोट्या खटल्याबद्दल तरुणास मिळाली १५ लाख भरपाई

False Rape Case

चेन्नई : बलत्काराच्या (Rape) खोट्या खटल्याने बदनामी झाल्याबद्दल येथील दिवाणी न्यायालयाने संतोष नावाच्या एका तरुणास १५ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली आहे. जिच्या फिर्यादीवरून हा खटला दाखल केला गेला ती तरुणी व तिची आई या दोघींनी मिळून संतोषला ही भरपाई द्यायची आहे.

दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर ७, रुल  १  अन्वये संतोषने या मायलेकींविरुद्ध नगर दिवाणी न्यायालयात ३० लाख भरपाईसाठी दावा दाखल केला होता. दिवाणी न्यायाधीश डॉ.आर. सत्य संतोष यांनी तो अंशत: मंजूर करूना हा आदेश दिला. २३ जानेवारी या तारखेचे हे निकालपत्र १ फेब्रुवारी रोजी खुल्या न्यायालयात जाहीर केले गेले होते. पण ते न्यायालयाच्या वेबसाइटवर काही दिवसांपूर्वी उपलब्ध झाले.

संतोषला जामीन मिळण्याच्या आधी ९५ दिवस कोठडीत राहावे लागले व सात वर्षे खटल्याला सामोरे जावे लागले. यामुळे त्याच्या अभियांत्रिकीच्या शिक्षणात खंड पडला, ड्रायव्हिंग लायसेन्स मिळाले नाही व समाजात एकूणच बदनामी झाली त्याबद्दल ही भरपाई मंजूर करण्यात आली.

संतोषला जामीन मिळण्याआधीच ही फिर्यादी तरुणी प्रसूत होईन तिला मुलगी झाली. त्यामुळे खटला सुरु झाल्यावर सत्र न्यायालयाने ‘डीएनए’ चाचणी करण्याचा आदेश दिला. त्यातून फिर्यादीला झालेली मुलगी संतोषपासून झालेली नाही असा नि:संदिग्ध निष्कर्ष निघाल्यानंतर संतोषला खटल्यातून निर्दोष मुक्त केले गेले. त्यानंतर संतोषने हा भरपाईसाठी दिवाणी दावा दाखल केला.

संतापजनक बाब अशी की, संतोष आणि ही फिर्यादी तरुणी परस्परांच्या शेजारी राहायचे. या तरुणीला दिवस गेल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले तेव्हा त्या तरुणीने संतोषवर आळ घेतला. याचा बाहेर बभ्रा व्हायच्या आता दोघांचे लग्न करून टाकण्याचा फिर्यादीच्या कुटुंबियांनी तगादा लावला. परंतु संतोषने आरोपाचा ठामपणे इन्कार करून लग्नासही नकार दिला. या कटकटीमुळे संतोषचे कुटुंब  ती जागा सोडूून नंतर दुसरीकडे राहायला गेले.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER