
सिद्धहस्त लेखक आणि आधुनिक वाल्मीक असं ज्यांचं वर्णन केलं जातं, ते ग. दि. माडगूळकर (Gajanan Digambar Madgulkar) हे खरं तर महाराष्ट्राला ललामभूत असं व्यक्तिमत्त्व. त्यांच्या ‘गीत रामायणा’बरोबरच शेकडो गीतं, गद्यलेखन आणि त्याबरोबरच चित्रपटातून त्यांनी केलेल्या भूमिका, हे सारं बघितल्यावर त्यांचं स्मारक त्यांनी वास्तव्य केलेल्या पुण्यात होणं उचितच ठरणार आहे.
गदिमांचं स्मारक व्हावं, यासाठी कवी प्रदीप निफाडकर यांनी घोषित केलेलं १४ डिसेबरचं आंदोलन करणं योग्य नाही, असं म्हणत या आंदोलनात माडगूळकर कटुंबीय सहभागी होणार नाहीत, असं गदिमांचे नातू सुमित्र यांनी जाहीर केलंय. माडगूळकर कुटुंबीयही या आंदोलनात सहभागी होणार होते. मात्र, सुमित्र यांना दिलेल्या आश्वानानुसार पत्रकार परिषद घेऊन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गदिमांच्या स्मारकाची घोषणा केलीय.
महिनाभरात स्मारकाचं भूमिपूजन करू, असंही त्यांनी जाहीर केलंय. ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाच्या मागणीसाठी १४ डिसेंबरला पुण्यामध्ये गदिमांच्या कविता वाचनाचा कार्यक्रम करून गदिमा जागर केला जाणार आहे. निफाडकर यांनी आंदोलन जाहीर करताना आपण त्यांना पाठिंबा दिला होता; पण महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन स्मारकाची घोषणा न केल्यानं आपण हा पाठिंबा दिला होता, असं सुमित्र माडगूळकर यांनी म्हटलं आहे. घटनाक्रमानुसार यापूर्वी २००७ मध्येच गदिमांच्या स्मारकाची घोषणा झाली होती; पण त्यावर फारसं काही काम झालं नाही. त्यानंतर २०१८ मध्ये स्मारकासाठी महात्मा सोसायटीजवळ जागा देण्यात आली.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सुमित्र माडगूळकर यांना सांगितलं की, स्मारकाची तयारी झालीय; पण कोरोनामुळं आणि पाठोपाठ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ते घोषणा करू शकले नाहीत; पण त्यांनी पदवीधर शिक्षक निवडणुकीच्या नंतर लगेचच पत्रकार परिषद घेऊन स्मारकाविषयीच्या सर्व शंकांवर उत्तरं दिली आहेत. त्यानुसार स्मारकासाठी आठ कोटी रुपयांची तरतूदही केलेली आहे आणि आठ एकर जागेत प्रदर्शन हॉल आणि गदिमा स्मारक उभारले जाणार आहे. दहा हजार चौरस फुटाच्या तीन मजली इमारतीत गदिमांविषयक पाच दालनं आकाराला येणार आहेत.
त्यात गीत रामायणाचं स्वतंत्र दालन असणार आहे. महिनाभरात स्मारकाचं भूमिपूजन केलं जाणार आहे. सुमित्र माडगूळकर यांचा महापौरांवर विश्वास असेल तर त्यांनी तो ठेवावा; पण गेली अनेक वर्षे आम्ही फक्त आश्वासनंच ऐकत असल्यानं १४ डिसेंबरचं गदिमा काव्यवाचनाच्या जागराचं आंदोलन आम्ही करणार आहोत, असं निफाडकर यांनी सांगितलंय. महाराष्ट्राच्या आधुनिक वाल्मीकीनं गदिमांनी गीत रामायण लिहिलं आहेच. पण त्याबरोबरच त्यांनी ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा…’ हेही लिहून ठेवलंय. त्यांच्या स्मारकावरून सुरू झालेल्या या वादामुळं पुन्हा एकदा ‘पराधीन आहे…’ची प्रचिती माडगूळकर कुटुंबीय, आंदोलनकर्ते आणि सर्वच गदिमाप्रेमींना, रसिकांनाही येत आहे.
शैलेंद्र परांजपे
Disclaimer:- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला