कामगाराचे घर फोडले दुचाकीसह रोख, दागिने लंपास

Theft

औरंगाबाद : बाहेरगावी गेलेल्या कामगाराचे घर फोडून चोरांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह घरासमोर उभी असलेली दुचाकी लंपास केली. ही घटना ९ जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास पिसादेवी रोडवरील हनुमाननगरात घडली. तर अब्दीमंडीतील डॉक्टरचे घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि वीस हजाराचे दागिने लंपास केले.

सोमीनाथ आबा बोडखे (२९, रा. प्लॉट क्र. ३७, हनुमाननगर, पिसादेवी रोड, हर्सुल परिसर) हे ८ जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास बाहेरगावी गेले होते.त्याची संधी साधून चोराने दरवाजाचा कडीकोंडा तोडला. त्यानंतर आत शिरलेल्या चोराने दोन ग्रॅमचे सोन्याचे ओम, दीड ग्रॅमची नथ, एक ग्रॅमची अंगठी, दहा ग्रॅमचे चांदीचे कडे, पाच ग्रॅमचे बाजूबंद आणि २ हजारांची रोकड असा ऐवज लंपास केला. याशिवाय बोडखे यांच्या घरासमोरील सुरेश गोपीनाथ गुजर यांची दुचाकी (एमएच-२०-ईएक्स-१६७१) लांबवली.

याप्रकरणी हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दुसरी घटना अब्दीमंडी भागात घडली. डॉक्टर शेख शफी शेख नसीर (५२) हे अब्दीमंडीतील घराला कुलूप लावून ८ जुलै रोजी सकाळी नऊच्या सुमारास सिल्कमिल कॉलनीतील रुग्णालयात गेले होते. यानंतर भरदिवसा चोराने दरवाजाचा कडीकोंडा तोडून चांदीचे दागिने व २० हजारांची रोकड लंपास केली. याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER