राष्ट्रवादीचा शब्द; इतिहासात पहिल्यांदाच चिपळूण पंचायत समिती सभापतिपद बौद्ध समाजाला

Maharashtra Today

चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेला शब्द पाळल्याने इतिहासात पहिल्यांदाच चिपळूण पंचायत समितीच्या (Chiplun Panchayat Samiti ) सभापतिपदी बौद्ध समाजाच्या असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रिया कांबळे (Rhea Kamble) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे चिपळूण पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच सभापतिपद बौद्ध समाजाला देण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी रिया कांबळे यांना सभापतिपदासाठी दिलेला शब्द पाळला आहे.

शिवसेनेच्या माजी सभापती धनश्री शिंदे यांनी राजीनामा दिल्याने १ एप्रिल रोजी सभापतिपदासाठी निवडणूक पार झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी काम बघितले. सभापतिपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे होते. त्यामुळे महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रिया कांबळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण पवार यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

सभापती निवडीपूर्वी सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या स्वतंत्र बैठका झाल्या. राष्ट्रवादीच्या बैठकीत रिया कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कोकरे गणाच्या सदस्या समिक्षा घडशी यांनीही इच्छुक असल्याचे सांगितले होते. त्यावर आमदार निकम व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. शिवसेनेच्या बैठकीत महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याच्या सूचना सदस्यांना दिल्या होत्या. त्यामुळे रिया कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. या वेळी आमदार शेखर निकम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, शिवसेनेचे प्रताप शिंदे, माजी सभापती शौकत मुकादम, गटनेते नंदकुमार शिंर्के, राकेश शिंदे, माजी सभापती पूजा निकम आदी उपस्थित होते.

हा तर समाजाचा गौरव…

सभापतिपद खुल्या गटातील महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले होते. पंचायत समितीच्या इतिहासात सभापतिपदी पहिल्यांदाच बौद्ध समाजाला संधी मिळाली. रिया कांबळे यांच्या रूपाने चिपळूण तालुक्‍यात प्रथमच बौद्ध समाजाला सभापतिपदाची संधी मिळाली. हा समाजाचा गौरव असल्याचे मत विविध आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button