‘माझ्याविरुद्ध याचिका करणारी स्त्री मला माझ्या मुलीसारखी’

Bombay High Court - Sanjay Raut
  • खासदार संजय राऊत यांचे हायकोर्टात प्रतिपादन

मुंबई : व्यवसायाने मानसोपचारतज्ज्ञ असलेल्या कालिना येथील ज्या स्त्रीने मी तिचा मानसिक छळ करीत असल्याची पोलिसांत फिर्याद करून त्यावरून गुन्हा नोंदवून माझ्यावर फौजदारी कारवाई करण्यासाठी याचिका केली आहे त्या स्त्रीशी माझे कौटुंबिक संबंध आहेत व ती मला माझ्या मुलीसारखी आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे (Shiv Sena) राज्यसभा सदस्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उच्च न्यायालयात केले आहे.

डॉ. स्वप्ना पाटकर नावाच्या या स्त्रीने केलेल्या याचिकेवर न्या. संभाजी शिवाजी शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली तेव्हा खासदार राऊत यांच्यावतीने ज्येष्ठ वकील प्रसाद धाकेफळकर यांनी राऊत यांच्यावरील आरोपांचे साफ खंडन केले. ढाकेफळकर म्हणाले की, याचिकाकर्ती आणि तिच्या पतीमध्ये वैवाहिक कलह सुरु असून त्यात खासदार राऊत तिच्या पतीची बाजू घेऊन तिचा छळ करत आहेत, असा गैरसमज करून घेऊन या महिलेने राऊत यांच्यावर वारेमाप आरोप केले आहेत. त्यात सत्याचा लवलेशही नाही.

मुळात या महिलेने उच्च न्यायालयात याचिका करणेच चूक आहे, असा प्राथमिक आक्षेप घेत धाकेफळकर म्हणाले की, तक्रार करूनही पोलीस काही करत नाहीत असे तिचे म्हणणे असेल तर दंडाधिकाºयांपुढे जाऊन खासगी फिर्याद गुदरण्याचा मार्ग तिला खुला आहे. शिवाय राष्ट्रीय महिला आयोगाने निर्देशा देऊनही ‘झोन ८’च्या पोलीस उपायुक्तांनी काही केले नाही, ही बाब ती त्याच आयोगापुढेही मांडू शकते.

या महिलेच्या याचिकेत महाराष्ट्र सरकार, वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक, ‘झोन ८’चे बीकेसी येथील पोलीस उपायुक्त व खासदार राऊत यांना प्रतिवादी केले गेले आहे. सन २०१३ मध्ील दोन व सन २०१८मधील एका फिर्यादीवर पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही म्हणून तिने ही याचिका केली आहे. यातील एक फिर्याद अनोळखी व्यक्तिंविरुद्ध, दुसरी तिचा पाठलाग करणाºया व्यक्तीविरुद्ध व तिसरी थेट खासदार राऊत यांच्याविरुद्ध आहे. संजय राऊत आपला मानसिक छळ करतात व त्यांच्या दबावामुळे पोलीस काहीच करत नाहीत, असा तिचा आरोप आहे.

मुख्य पब्लिक प्रॉसिक्युटर दीपक ठाकरे यांनीही या महिलेची याचिका न्यायालयाने ऐकण्यास विरोध केला. याचिकाकर्तीच्या दोन तक्रारींवर पोलिसांनी तपास करून ‘बी समरी’ अहवाल सादर केला आहे तर एका तक्रारीचा तपास करून आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे याचिका करण्याचे काही कारण नाही, असे त्यांचे म्हणणे होते. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राची एक प्रत दोन दिवसांत याचिकाकर्तीस व एक न्यायालयास द्यावी, असे खंडपीठाने ठाकरे यांना सांगितले. तसेच याचिकाकर्ती व खासदार राऊत यांनी कोर्टाबाहेर परस्परांवर आरोप करण्याचे टाळावे अशी सूचना करून पुढील सुनावणी १० मार्च रोजी ठेवली गेली.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER