
सांगली : मिरज तालुक्यातील पाटगाव येथे दि. 24 मे रोजी झालेल्या अज्ञात तरुणाच्या खुनाचा छडा लावण्यात सांगली पोलिसांना मंगळवारी यश आले. अनैतिक संबंधाच्या कारणावरून तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील विक्रम मोहन पवार ( वय 35) याचा खून केल्याप्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी मंगळवारी दिली.
सोनी पाटगाव येथील नामदेव पाटील यांच्या शेताच्यालगत असलेल्या म्हसोबा ओढयाच्या पात्रात झुडपामध्ये अंदाजे ३५ वर्षाच्या व्यक्तीचा मृतदेह 24 मे रोजी सकाळी आढळला होता . यावरून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा उघडकीस आणणे हे एक आव्हानच पोलिसांसमोर होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक पिंगळे यांनी उपनिरीक्षक प्रदिप चौधरी, अभिजीत सावंत व कर्मचारी यांची दोन पथके तयार करून त्यांना तपासाबाबत सुचना दिल्या होत्या.
मंगळवारी घटनेच्या अनुषंगाने पुन्हा घटना स्थळी जावुन पथकाने शेत मालक व शेतमजुर यांच्याकडे सविस्तर चौकशी केली. त्यावेळी मयताबाबत पोलीस नाईक सागर लवटे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, त्या व्यक्तीचा खुन हा अनैतीक संबंधातुन झालेला असुन मयताचे नांव विक्रम मोहन पवार असल्याचे समजले.
अधिक माहिती घेतली असता, यामध्ये सारीका सुरेश माने हिचे मयताबरोबर अनैतीक संबंध होते . तो वारंवार तिला त्रास देवुन मारहाण करत होता . त्यामुळे तिनेच युवराज पाटील ( रा पाटगाव ) याच्या मदतीने काठीने मारहाण करून पवार याचा खून केला असल्याची माहीती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी युवराज भानुदास पाटील (वय-31 ) आणि सारीका सुरेश माने ( वय-29, रा पाटगांव ) या दोघांना ताब्यात घेऊन मिरज ग्रामीण पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. सदरचा गुन्हा उघडकीस आणणाऱ्या पथकामध्ये बिरोबा नरळे, निलेश कदम, जगन्नाथ पवार, संजय कांबळे, सागर लवटे, दरीबा बंडगर, संदिप गुरव, संदिप नलवडे, अनिल कोळेकर, संतोष गळवे, सुधीर गोरे, हेमंत ओमासे, शशीकांत जाधव, सुनिल लोखंडे, चेतन महाजन, गौतम कांबळे, सुप्रिया साळुखे, सीमा तोडकर, विमल नंदगावे, ज्योती चव्हाण चालक शंकर पाटील यांनी सहभाग घेतला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला