प्रियकरासोबत पळून गेलेल्या सज्ञान मुलीस वडिलांकडे देण्यास नकार

Aurangabad Bench Of Bombay High Court - Couple
  • औरंगाबाद खंडपीठाकडून प्रेमी युगुलास दिलासा

औरंगाबाद : घर सोडून प्रियकरासोबत पळून गेलेली मुलगी व तिचा प्रियकर हे दोघेही सज्ञान असल्याने आणि ‘मला आई-वडिलांशी बोलण्याची किंवा त्यांच्या घरी परत जाण्याची बिलकूल इच्छा  नाही’, असे या मुलीने नि:संदिग्धपणे सांगितले असल्याने तिला तिच्या वडिलांच्या ताब्यात देण्यास उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नकार दिला.

बीड जिल्ह्याच्या अंबेजोगाई तालुक्यातील मोरेवाडी येथील चंद्रशेखर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी त्यांची मुलगी मैथिली घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार गेल्या २१ डिसेंबर रोजी पोलिसांत नोंदविली. नंतर चंद्रशेखर यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘हेबियस कॉर्पस’ याचिका दाखल केली. त्यात त्यांनी आपल्या मुलीला तिच्या प्रियकराने पळवून नेल्याचा आरोप केला. तिचा हा प्रियकर कर्नाटकात बंगळुरु येथे राहणारा आहे. न्यायालयाने मुलीचा शोध घेऊन ती सापडल्यास तिला न्यायालयापुढे ३१ मार्च रोजी हजर करण्याचा आदेश दिला.

पोलिसांना मुलगी सापडली नाही. पण ३१ मार्च रोजी मैथिली स्वत:हून रवींद्र घुगे व न्या. बी. यू. देबडवार यांच्या खंडपीठापुढे हजर झाली. न्यायमूर्तींनी तिच्या आधारकार्डावरून तिच्या ओळखीची खात्री करून घेतली. नंतर न्यायमूर्तींनी खुल्या न्यायालयात मैथिली हिला काही प्रश्न विचारले. त्याला तिने दिलेल्या उत्तरातून पुढील माहिती समोर आली: मुलीचे वय १८ वर्षे सहा महिने आहे. तिचे तिच्या प्रियकरावर प्रेम आहे व घर सोडून गेल्यापासून ती त्याच्यासोबतच राहात आहे. प्रियकराच्या वयाला येत्या २९ एप्रिल रोजी २१ वर्षे पूर्ण होताच दोघेही रीतसर लग्न करणार आहेत.

आपल्या प्रेम प्रकरणाने वडील कमालीचे संतापले असल्याने ते आमचे काही बरेवाईट करतील अशी भीती असल्याने न्यायालयाच्या रेकॉर्डमध्ये माझे सध्याचे राहण्याचे ठिकाण कुठेही नोंदवू नये व आम्हा दोघांना संरक्षण द्यावे, अशी विनंती मैथिलीने न्यायालयास केली.

यानंतर कोर्टात हजर असलेल्या मैथिलीच्या वडिलांनी तिच्याशी बोलू देण्याची विनंती केली. त्याविषयी न्यायालयाने विचारता मैथिलीने त्यावर अशी उत्तरे दिली:

-मला वडिलांना भेटण्याची किंवा त्यांच्याशी बोलण्याची इच्छा नाही.
-मला वडिलांना किंवा आईला भेटण्याची सक्ती करू नये.
-माझी आई-वडिलांच्या घरी परत जाण्याची इच्छा नाही.
-मला मोरेवाडीला (ता. अंबेजोगाई) परत जाण्याची जबरदस्ती करू नये.
-माझ्या सोबत माझा प्रियकरही आलेला आहे. पण तो कोर्टात न येता थोडया अंतरावर बाहेर थांबला आहे.
-आत्ता मी त्याच्यासोबत जेथून कोर्टात आले तेथेच मी त्याच्यासोबत परत जाईन.

माहेरचे घर सोडून प्रियकरासोबत राहू लागल्यापासून त्याने मला कधीही, कोणत्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक त्रास दिलेला नाही, असेही मैथिलीने न्यायालयास सांगितले.

मैथिलीने व्यक्त केलेल्या भीतीविषयी विचारता तिच्या वडिलांनी न्यायालयास असे आश्वासन दिले की, मी स्वत: किवा माझ्या कुटुंबाकडून मैथिलीला, तिच्या प्रियकरला किंवा तिच्या आई-वडिलांना कोणताही इजा केली जाणार नाही.

या सर्वाची नोंद घेऊन मैथिलीच्या वडिलांनी केलेली याचिका निकाली काढताना खंडपीठाने म्हटले: मैथिली सज्ञान आहे व तिच्या प्रियकराचे लग्नाचे कायदेशीर वय झालेले नसले तरी तोही सज्ञान आहे. मैथिलीने न्यायालयात आम्हाला जी उत्तरे दिली ती पाहता आम्ही तिला रोखू शकत नाही किंवा वडिलांच्याही ताब्यात देऊ शकत नाही.

मैथिलीच्या प्रियकराच्या वडिलांनी तिच्या वडिलांविरुद्ध जिवे मारण्याच्या धमक्या देणे व अपहरणाचा प्रयत्न करणे अशा आरोपांचे गुन्हे नोंदविले आहेत. त्याची दखल घेत न्यायालयाने मैथिलीच्या वडिलांना इशारा दिला की, या उप्पर मैथिली किंवा तिच्या प्रियकराला काही इजा पोहोचली व त्यांनी त्याचा आरोप तुमच्यावर केला तर त्याचे कायदेशीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button