पतीच्या उत्पन्नाची माहिती पत्नी ‘आरटीआय’खाली मागू शकते

Cic

नवी दिल्ली : माहिती अधिकार कायद्यान्वये (Right to Information Act-RTI) अर्ज करून पत्नी पतीच्या उत्पन्नाची माहिती प्राप्तिकर विभागाकडेमागू शकते,असा निकाल केंद्रीय माहिती आयोगाने (Central Information Commmission) दिला आहे.

जोधपूर येथील रेहमत बानो या महिलेने तेथील प्राप्तिकर कार्यालयाकडे ‘आरटीआय’खाली अर्ज करून तिचा पती मोहम्मद शफीक मोहम्मद रमझान यांच्या सन २०१७ व १८ या वर्षातील प्राप्तिकर रिटर्नच्या प्रती मागितल्या होत्या. प्राप्तिकर विभागाचे माहिती अधिकारी, अपिली माहिती अधिकारी व राज्य माहिती आयोग या सर्वांनी ‘आरटीआय’ कायद्याच्या कलम ८ मध्ये दिलेल्या अपवादांवर बोट ठेवून ही माहिती देण्यास नकार दिला.

हा निकाल देताना या तिन्ही प्राधिकाºयांनी गिरीश रामचंद्र देशपांडे वि. केंद्रीय माहिती आयुक्त या प्रकरणात सन २०१२ मध्ये दिलेल्या निकालाचा आधार घेतला होता. त्या  निकालात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, कोणाही व्यक्तिने त्याच्या प्राप्तिकर रिटर्नमध्ये दिलेली माहिती ही पूर्र्णपणे व्यक्तिगत स्वरूपाची असते. त्यामुळे अशा माहिती उघड करणे व्यापक जनहिताच्या दृष्टाने हिताचे आहे याविषयी खात्री झाल्याखेरीज अशी माहिती कोणाही त्रयस्थाला ‘आरटीआय’खाली देता येणार नाही. या  निकालासही ‘आरटीआय’ कायद्याच्या कलम ८चाच आधार घेण्यात आला होता.

परंतु केंद्रीय माहिती आयुक्त नीरज कुमार गुप्ता यांनी सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल बाजूला ठेवून रेहमत बानू हिच्या बाजूने निकाल दिला. त्यासाठी त्यांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (राजेश रामचंद्र किडिले वि. महाराष्ट्र राज्य माहिती आयोग) दिलेल्या निकालांचा आधार घेतला. गिरीश देशपांडे प्रकरणातील निकालाचे वेगळेपण दाखवून या दोन निकालपत्रांनी असे म्हटले होते की, ज्याचा काहीही संबंध नाही अशा पूर्णपणे त्रयस्थाने एखाद्या व्यक्तिच्या प्राप्तिकर रिटर्नची माहिती मागणे व पत्नीने पतीच्या प्राप्तिकर रिटर्नची माहिती मागणे यात फरक आहे.

माहिती मागणारी व जिच्याविषयी मागितली असेल त्या व्यक्तींचे नाते पती-पत्नीचे असेल तेव्हा काहीही संबंध नसलेल्या त्रयस्थाला लावले जाणारे निकष लावता येणार नाहीत. कारण पती त्याच्या उत्पन्नाची खरी माहिती स्वत:हून देत नसेल किंवा ती दडवून ठेवत असेल तर ती माहिती पती जेथे नोकरी करत असेल तेथे किंवा प्राप्तिकर विभागाकडे ‘आरटीआय’ अर्ज करून मिळविणे हा पत्नीचा स्वाभाविक हक्क आहे. अशी माहिती त्रयस्थाला दिली जाणारी व्यक्तिगत महिती ठरत नसल्याने तिला कलम ८चा अपवाद लागू होत नाही. तरीही माहिती आयुक्तांनी रेहमत बानोला तिच्या पतीच्या प्राप्तिकर रिटर्नच्या प्रती नव्हे तर त्यातील फक्त उत्पन्नाची माहिती देण्याचा आदेश प्राप्तिकर विभागास दिला.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER