दिव्यांगांच्या योग्य संबोधनाहून त्यांचे कल्याण अधिक महत्वाचे

Madras hC - Maharastra Today
  • दिव्यांग शब्दाविरुद्धची यायिका फेटाळली

चेन्नई : अपंग आणि गतिमंद व्यक्तींना कशा प्रकारे संबोधणे राजकीयदृष्टया अधिक सयुक्तिक होईल यावर कीस काढण्याच्या फॅडाहून सरकार या व्यक्तींच्या कल्याणासाठी किती परिणामकारक योजना राबविते हे पाहणे अधिक महत्वाचे आहे, असे म्हणत मद्रास उच्च न्यायालयाने ‘दिव्यांग’ या शब्दाला आक्षेप घेणारी जनहित याचिका फेटाळून लावली.

एम. कर्पगम यांनी ही याचिका केली होती. दिव्यांग किंवा गतिमंद यासारखे शब्दप्रयोग संबंधित व्यक्तीला कमी लेखणारे असल्याने कोणत्याही कायद्यात, सरकारी धोरणांत किंवा नियमावलीत त्यांचा वापर करण्यास बंदी करावी,अशी त्यांची मागणी होती. भारताने अपंगांसाठी अधिकृतपणे ‘दिव्यांग’ हा शब्द वापरण्यास सुरुवात केल्यावर संयुक्त राष्ट्रसंघानेही त्यास आक्षेप घेऊन त्याचा वापर बंद करणयाची विनंती केली होती,याकडे याचिकाकर्त्याने लक्ष वेधले.

याचिका निकाली काढताना मुख्य न्यायाधीश न्या. संजीव बॅनर्जी व न्या. सेंथीलकुमार राममूर्ती यांच्या खंडपीठाने म्हटले की, सर्वसामान्यांहून निराळ्या क्षमता असलेल्या व्यक्तींचा उपमर्दकारक उल्लेख केला जाऊ नये यामागची याचिकाकर्त्यांच्या भावनेची आम्ही कदर करतो. पण अशा व्यक्तींना याचे फॅड जोपासत बसण्यापेक्षा सरकार त्यांच्या कल्याणासाठी काय करत आहे, यास महत्व द्यायला हवे.

न्यायालयाने असेही म्हटले की, अशा व्यक्तींचा योग्य पद्धतीने उल्लेख करण्याच्या प्रामाणिक उद्देशाने केंद्र सरकारने राज्यांशी विचार-विनिमय करून ‘दिव्यांग’ व ‘दिव्यांगजन’ या शब्दांचा वापर सुरु केला आहे. त्यामुळे हा विषय मूर्खता ठरेल एवढा ताणला जाऊ नये. शिवाय सरकारने ‘मतिमंदता’ याऐवजी ‘बौद्धिक अक्षमता’ हा शब्द वापरणे सुरु केले आहे.

खंडपीठाने नमूद केले की, यापूर्वीही जे शब्द वापरले जात होते तेव्हाही संबंधित व्यक्तींना कमी लेखण्याचा कधीच उद्देश नव्हता. त्यावेळच्या सामाजिक धारणेनुसार ते वापरले जात होते. आम्ही ही याचिका स्वीकारत नसलो तरी, आपल्याला मुख्य प्रवाहात मानाचे स्थान मिळत आहे, अशी या निराळ््या क्षमतेच्या व्यक्तींची खात्री होणार असेल तर सध्याहून अधिक चांगल्या संबोधनाचा विचार करण्यास सरकारला आडकाठी असणार नाही.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button