सावरकरांवरील त्या लिखाणाबद्दल ‘द वीक’ची माफी

Veer Sawarkar - Maharashtra Today

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर म्हणजे प्रखर देशभक्ती, जाज्वल्य देशाभिमान. भारतीय स्वातंत्र्याचा लढा देताना ब्रिटिशांनी त्यांना अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. त्यांना बैलाच्या जागी अतिशय जड असा घाणा ओढावा लागत असे. त्यांचा अनन्वित छळ केला गेला. मात्र, इंग्रजांच्या या जुलमांसमोर सावरकर ना झुकले, ना वाकले. अंदमानच्या सेल्युलर जेलच्या भिंतीवर त्यांनी लिहिले, ‘ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला’ ज्यांच्या सत्तेचा सूर्य कधीही मावळत नाही, असे म्हटले जायचे त्या ब्रिटिशांविरुद्ध सावरकरांनी केलेल्या संघर्षाला जगात तोड नाही.

भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात सर्वाधिक म्हणजे ३७ वर्षे जेलमध्ये राहिलेले सावरकर, ज्यांना एक नाही, दोन दोन जन्मठेप ब्रिटिशांनी सुनावल्या होत्या, असे होते सावरकर. जगभरातील क्रांतिकारकांसाठी सावरकर हे एक आदर्श मानले जातात. प्रखर हिंदुत्ववादी असलेले सावरकर हे मराठी माणसाचा मानबिंदूच. मार्सेलिसच्या किनाऱ्यावर मोरिया बोटीतून सावरकरांनी समुद्रात घेतलेली उडी हा एक अजरामर ऐतिहासिक प्रसंग आहे. अशा सावरकरांविषयी घृणास्पद विचार करणाऱ्यांचीही कमी नाही. अशांपैकीच एक पत्रकार निरंजन टकले यांचा एक लेख नामांकित अशा ‘द वीक’ या साप्ताहिकात २४ जानेवारी २०१६ रोजी छापून आला आणि देशभर खळबळ माजली.

सावरकरांच्या असीम देशभक्तीवर टकले यांच्या त्या लेखाने भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे केले. सावरकरांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह भाषा त्या लेखात वापरण्यात आली होती. पुढे काही महिन्यांनी टकले हे ‘द वीक’मधून बाहेर पडले. म्हणजे त्यांना काढून टाकण्यात आले, घरी जाण्यास सांगितले वगैरे. कारण व्यवस्थापनाने आपल्याला हटविले असा संदर्भ त्यांच्याच एका भाषणात एकदा आला होता. टकले हे आता ‘द वीक’साठी काम करत नाहीत; पण त्यांनी पाच वर्षांपूर्वी लिहिलेल्या लेखावर माफी मागण्याची वेळ ‘द वीक’च्या व्यवस्थापनावर आली आहे.

तर आता तब्बल ५ वर्षे ४ म न्यांनी ‘द वीक’ला उपरती झाली आहे. आपण चुकलो हे त्यांनी मान्य केले आहे. त्यांच्या ताज्या अंकात त्याबाबतचा माफीनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याचा मराठी अनुवाद असा : ‘ विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयीचा एक लेख ‘द वीक’मध्ये २४ जानेवारी २०१६ रोजी  प्रकाशित करण्यात आला होता. ‘लॅम्ब लायनाईज्ड्’ असे त्याचे शीर्षक होते. ‘हीरो टू झीरो’ असे त्यात सावरकरांविषयी लिहिलेले होते. त्यामुळे सावरकर उच्च प्रतिष्ठित व्यक्तीविषयी गैरसमज निर्माण झाले आणि चुकीचे आकलन झाले. सावरकर हे महानच होते असे आम्ही मानतो. या लेखामुळे कुण्या व्यक्तींच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही व्यवस्थापन म्हणून खेद व्यक्त करतो आणि माफी मागतो.’

Discalimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button