मानवावर केल्या जाणाऱ्या क्लिनिकल ट्रायलवर येणार वेबसीरीज

human

कोणतेही औषध किंवा एखादी लस तयार करायची असेल तर त्याचे सर्वप्रथम प्राण्यांवर परीक्षण केले जाते. प्राण्यांवर प्रयोग यशस्वी झाला की त्याचे मानवावर प्रयोग केले जातात. या क्लिनिकल ट्रायलसाठी लोकांना स्वतःहून पुढे यायचे आवाहन केले जाते तर कधी कधी गुप्तपणे माणसांवर अशा औषधांचे प्रयोग केले जातात. आता कोविड लसीच्या परीक्षणासाठी लोकांनी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले होते आणि त्याला लोकांचा चांगला प्रतिसादही मिळाला होता. त्यामुळे सामान्य जनतेला अशा प्रकारची लस टोचून घेण्यासाठी स्वयंसेवकांची गरज असते हे समजले. मात्र गुप्तपणे अशा क्लिनिकल ट्रायल खूप मोठ्या प्रमाणावर केल्या जातात. या विषयावर आतापर्यंत हॉलिवूडमध्ये काही सिनेमे आले असले तरी बॉलिवूड मात्र अशा विषयांपासून लांबच होता. मात्र हाच विषय घेऊन एका निर्मात्याने एक वेबसीरीज तयार करण्याची योजना आखली आहे.

गेल्या २० वर्षांपासून बॉलिवूडमध्ये (Bollywood) कार्यरत असलेल्या निर्माता-दिग्दर्शक विपुल शाहने या विषयाला हात घातला आहे. मानवावर केल्या जाणाऱ्या क्लिनिकल ट्रायलचा विषय घेऊन तो एक वेबसीरीज तयार करणार आहे. विपुल शाह (Vipul Shah)हा बॉलिवूडमधील मोठा निर्माता-दिग्दर्शक असून त्याने आजवर अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमारसोबत ‘आंखे’, ‘वक्त’, ‘नमस्ते लंडन’ असे हिट सिनेमे दिले आहेत. या वेबसीरीजबाबत बोलताना विपुलने सांगितले, आता काही जणांना वाटेल की कोरोनामुळे मी या विषयाला हात घातला आहे. पण तसे नाही. गेल्या तीन वर्षांपासून मी या विषयावर काम करीत होतो. रॉम कॉमच्या ऐवजी मला काही तरी वेगळे करायचे होते म्हणून कोणीही हात न लावलेल्या या विषयावर मी काम सुरू केले होते. ह्युमन ट्रायल (Human Trial) कशा होतात याची सविस्तर माहिती गोळा करण्यात माझा वेळ गेला होता. कारण याची माहिती सहजासहजी उपलब्ध नाही. वेबसीरीजच्या जगात माझे हे पहिलेच पाऊल आहे, असेही विपुलने सांगितले.

‘ह्युमन’ असे नाव असलेल्या या वेबसीरीजची निर्मिती सनशाईनद्वारा केली जात असून या वेबसीरीजचे दिग्दर्शन विपुल शाह आणि लेखक मोजेज सिंह करीत आहेत. या वेबसीरीजमध्ये विपुलची पत्नी शेफाली आणि कीर्ती कुल्हारी मुख्य भूमिका साकारत आहेत. या वेबसीरीजचे शूटिंग सुरू  झाले असून लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर याचे प्रसारण केले जाणार आहे.

यासोबतच विपुल शाहने सोमवारी विद्युत जामवालसोबतच्या नव्या ‘सनक’ सिनेमाचे पोस्टरही सोशल मीडियावर (Social Media) रिलीज केले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कनिष्क वर्मा करीत आहे. या सिनेमात विपुल बंगाली अभिनेत्री रुक्मिणी मैत्राला लाँच करणार आहे. विद्युतसोबत विपुलचा हा पाचवा सिनेमा असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER