2021 मध्ये येणार सिक्वेल्सची लाट

2021 Movie sequels

2020 हे वर्ष सगळ्या जगालाच वाईट गेले. मात्र आता यातून सगळे सावरू लागलेले आहेत. कोरोनावर लस आल्याने जनतेला आता थोडा दिलासाही मिळाला आहे. जगातील काही देशात मात्र अजूनही लॉकडाऊन लागू करावा लागला आहे. या देशांच्या तुलनेत भारतात मात्र कोरोनाचा कहर कमी झाला असल्याने आता नव्या जोमाने कामास सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी अनेक सिनेमांचे शूटिंग होऊ शकले नाही त्यामुळे ते सिनेमे रिलीजच झाले नाहीत. मात्र आता नव्या जोमाने शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे. नवीन मोठ्या सिनेमांसोबतच यावर्षी बॉलिवुडमध्ये सिक्वेल्सची लाट दिसणार आहे. याचे कारण वर सांगितल्याप्रमाणे गेल्या वर्षी शूटिंग होऊ न शकल्याने यावर्षी या सिनेमाचे शूटिंग सुरु झाले आहे आणि याचवर्षी हे सिनेमे प्रदर्शित केले जाणार आहेत. यावर्षी प्रदर्शित होणाऱ्या सिक्वेल्सवर एक नजर

दोस्ताना 2

करण जोहरने 2008 मध्ये जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन आणि प्रियांका चोप्रा यांना घेऊन ‘दोस्ताना’ सिनेमा तयार केला होता. दोन मित्र एका घरात राहाण्यासाठी गे कपल असल्याचे ढोंग करतात. त्यांच्या जीवनात एक मुलगी येते आणि त्यानंतर या दोघांना नसलेले गे पण लपवण्यात कशा अडचणी येतात ते खूपच मनोरंजकपणे दाखवण्यात आलेले होते. प्रेक्षकांना हा सिनेमा आणि जॉन, अभिषेकची जोडी खूपच आवडली होती. त्यानंतर आता याचा सिक्वेल ‘दोस्ताना 2’ ( Dostana 2) तयार केला जात आहे. मात्र यावेळी या सिनेमात कार्तिक आर्यन, लक्ष्य आणि जान्हवी कपूर (Janvi Kapoor) दिसणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन कॉलिन डिकून्हा करीत आहेत. हा सिनेमासुद्धा यावर्षी रिलीज करण्याची योजना आखण्यात आलेली आहे.

सत्यमेव जयते 2

15 ऑगस्ट 2018 ला जॉन अब्राहम आणि मनोज वाजपेयी यांच्या भूमिका असलेला अॅक्शनपॅक्ड ‘सत्यमेव जयते’ रिलीज झाला होता. मिलाप झवेरी दिग्दर्शित हा सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. त्यानंतर मिलापने याच्या सिक्वेलची ‘सत्यमेव जयते 2’ (Satyamev Jayate 2) ची आखणी केली. गेल्या वर्षी हा सिनेमा रिलीज केला जाणार होता. पण कोरोनामुळे सिनेमाचे शूटिंग झाले नाही त्यामुळे सिनेमा रिलीज होऊ शकला नव्हता. सध्या या सिनेमाचे लखनौमध्ये शूटिंग सुरु असून जॉन अब्राहम पुन्हा एकदा ‘सत्यमेव जयते 2’ मध्ये वीरेंद्र राठोडच्या भूमिकेत दिसणार आहे. सिक्वेलचे दिग्दर्शन मिलाप झवेरीच करीत असून जॉनच्या नायिकेच्या रुपात दिव्या खोसला कुमार दिसणार आहे. 12 मे 2021 ला हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे.

गो गोवा गॉन 2

हॉलिवुडमध्ये ज्याप्रमाणे झोम्बी सिनेमाची परंपरा आहे तशी बॉलिवुडमध्ये नाही. झोम्बी म्हणजे भुतांची वसाहत. या वसाहतीत माणसाचे जाणे आणि त्यांच्याशी सामना करून परत येणे यावर हॉलिवुडमध्ये अनेक सिनेमे तयार झाले आहेत. बॉलिवुडमध्ये सैफ अली खानने 2013 मध्ये हा जॉनर हाताळला होता आणि गो गोवा गॉन सिनेमाची निर्मिती केली होती. या सिनेमात सैफ अली, कुणाल खेमू, वीर दास आणि आनंद तिवारी यांच्या भूमिका होत्या. हा सिनेमा बऱ्यापैकी प्रेक्षकांना आवडला होता. आता सैफ अली पुन्हा एकदा झोम्बी जॉनर अंतर्गत ‘गो गोवा गॉन 2’ (Go Goa Gone 2)तयार करीत आहे. हा सिनेमा मार्चमध्ये रिलीज होणार आहे.

हंगामा 2

2003 मध्ये दिग्दर्शक प्रियदर्शनचा सुपरहिट कॉमेडी सिनेमा ‘हंगामा’ रिलीज झाला होता. परेश रावल, अक्षय खन्ना, रिमी सेन आणि आफताब शिवदासानी यांच्या भूमिका असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला होता. आता याचा सिक्वेल हंगामा 2(Hungama 2) नावाने तयार केला जात असून यात परेश रावल, शिल्पा शेट्टी, मीजान जाफरी आणि प्रणिता सुभाष मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा सिनेमा एप्रिल किंवा मे मध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

बंटी और बबली 2

यशराजने 2005 मध्ये अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जीला घेऊन ‘बंटी और बबली’ची निर्मिती केली होती. या सिनेमात हे दोघे चोर दाखवलेले असतात आणि ते लोकांना फसवून पसार होत असतात. अमिताभ बच्चन यांनी यात या दोघांना पकडण्यासाठी मागावर असलेल्या पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. ऐश्वर्या रायचे यात एक आयटम साँगही होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. आता यशराज या सिनेमाचा सिक्वेल ‘बंटी और बबली 2’ (Bunty and Babli2) तयार करीत आहे. यात यावेळी राणी मुखर्जीसोबत सिद्धांत चतुर्वेदी, सैफ अली खान आणि शर्वरी वाघ दिसणार आहेत. वरुण वर्मा दिग्दर्शित हा सिनेमा यावर्षी रिलीज होणार आहे.

भूल भुलैया 2

2007 मध्ये आलेला अक्षय कुमार, विद्या बालन आणि शायनी अहूजा अभिनीत सायकॉलॉजिकल-थ्रिलर ‘भूल भुलैया’ प्रेक्षकांना खूपच आवडला होता. या सिनेमाचा सिक्वेल ‘भूल भुलैया 2’ तयार केला जात असून यात यावेळी कार्तिक आर्यन, तब्बू आणि कियारा आडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमासुद्धा यावर्षी रिलीज होणार आहे.

बधाई दो

2018 मध्ये जंगली पिक्चर्सने ‘बधाई हो’ सिनेमा तयार केला होता. या सिनेमात आयुष्मान खुराना, नीना गुप्ता आणि आणि गजराज राव यांच्या मुख्य भूमिका होत्या. दोन मोठ्या मुलांची आई असलेली बाई पुन्हा गरोदर राहते आणि त्यानंतर काय गंमती घडतात त्याची कथा या सिनेमात मांडण्यात आलेली होती. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. आता याच सिनेमाचा सीक्वेल ‘बधाई दो’ या नावाने तयार केला जात आहे. यात यावेळी राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरची जोडी दिसणार आहे. या सिनेमाचे शूटिंग डेहराडूनमध्ये सुरु असून यावर्षी हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER