विषाणू निर्जीव पण माणसे बेदरकार…

Coronavirus

Shailendra Paranjapeसंपूर्ण जगात भारताची पाठ थोपटली गेली ती करोना प्रतिबंधासंदर्भात वेळीच उपाययोजना केल्याने. करोना रोगाचा फैलाव रोखण्यातही आपल्याला यश आले आणि मृत्यूदर जगातल्या इतर देशांच्या तुलनेत खूप कमी ठेवण्यातही यश आले आहे. मार्च २०२० मधे देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आले आणि करोनासंदर्भात देशपातळीवर विविध उपाययोजना करतानाच लसविकसनाच्या कामातही भारतानं जगात नाव कमावलं आहे. करोना (Corona) काळात इतर अनेक देशांना मदत करण्यासाठी सर्वात अग्रेसर राहिलेला देश म्हणूनही भारताचं जागतिक पातळीवर कौतुक झालं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं त्याबद्दल प्रशंसोद्गार काढले आहेत.

देशात प्रगतीशील राज्य म्हणून लौकिक असलेल्या महाराष्ट्राचं नाव करोना काळात मात्र रुग्णसंख्येच्या दृष्टीनं खराब झालं. मुंबई आणि पुणे ही महाराष्ट्रातली विकसित शहरं करोना रुग्णसंख्या रोखण्यात अपयशी ठरली. या शहरांचे कॉस्मोपॉलिटन असणे आणि वाढते नागरीकरण झाल्यानं मुंबई-पुण्याबाहेरची मोठ्या प्रमाणात असलेली लोकसंख्या, अशी काही वेगळी कारणंही त्यामागे होतीच. फ्लोटिंग पॉप्युलेशन हेही आणखी एक कारण त्यामागे होते. करोनाची भीती जवळपास नाहीशी होत असतानाच १ फेब्रुवारीपासून मुंबईतली उपनगरी रेल्वेसेवा म्हणजेच लोकल ट्रेनची सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर गेल् पंधरा दिवसात करोनाचे रुग्ण पुन्हा मोठ्या संख्येने वाढले आहेत. करोना रुग्णसंख्या वाढणे हे केवळ शहरी भागापुरते मर्यादित नसून राज्यातल्या ३६ पैकी २१ जिल्ह्यात करोनाचे रुग्ण वाढले आहेत आणि ग्रामीण भागातली रुग्णसंख्या वाढते आहे, ही महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhjav Thackeray)आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या दोघांनीही रुग्णसंख्या वाढल्याने पुन्हा कडक निर्बंध लादण्याची वेळ येऊ शकेल, असे सूतोवाच केले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुका या कारणांमुळे तसेच लग्नसमारंभासारख्या कार्यक्रमांमधून खेडोपाडी उसळलेली गर्दी यातून करोनाचा फैलाव पुन्हा एकदा झाला असावा. तीच गोष्ट शहरी भागातली. दुसरीकडे करोनाचा फैलाव कमी होत चालल्याने एक प्रकारची ढिलाई सर्वसामान्य नागरिकांच्या मनात वागण्यात आली होती. त्याचा परिणामही दिसून येत आहे. त्यामुळेच आता करोनाचे रुग्ण राज्यात अनेक ठिकाणी वाढत असताना पुन्हा कडक पावले उचलण्याचे इशारे दिले जात आहेत.

पुण्यामधे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमधे बुधवारी यासंदर्भात चर्चा करण्यात आली. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात गरज पडल्यास कडक पावले उचलावी लागतील, हे सांगताना करोना रुग्णांची संख्या आढळेल, त्या भागांमधे कंटेन्मेंट झोन जाहीर करून त्या भागाचे विलगीकरण करण्यात येईल, असे सांगितले आहे. त्यामुळे लॉकडाऊन नंतर मिशन बिगिन अगेन आणि अनलॉकपर्वातून सर्वसामान्यांचं जीवन सर्वच क्षेत्रांसाठी खुलं होत असताना पुन्हा निर्बंधांची वेळ आलीय ती आपल्या सर्वांच्या बेदरकार वागण्यामुळं. मुंबईत तर लोकल ट्रेनमधे गर्दी उसळलीच पण मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सँनेटायझर या त्रिसूत्रीचं पालन अजिबातच केलं गेलेलं नाही. तीच गोष्ट पुण्यातल्या अतिउत्साही मंडळींची. त्यामुळे करोनासारख्या साथीच्या रोगाला तोंड देताना वैयक्तिक बाबही सार्वजनिक हिताला किंवा अहिताला कारणीभूत होत असते, याचे भान आपल्या सर्वांना येण्याची गरज आहे.

वास्तविक, करोनानं शिकवलेल्या धड्यांसंदर्भात याच लेखमालेमधे यापूर्वी अनेक बाबींचा उहापोह केला आहे. पण करोनासारखा रोग असो की सरहद्दीलगतच्या शत्रूशी युद्ध, युद्धजन्य स्थितीमधे युद्ध संपेपर्यंत सत्तेवर असलेल्या सरकारच्या निर्णयांना प्रश्नचिन्ह न लावता आचरण करणे गरजेचे असते. पण आपल्याकडे विशेषतः पुण्यामधे चिंतातूर जंतू आणि व्हाट्स अँप विद्यापीठामुळे घराघरात उगवलेले तज्ज्ञ यांच्यामुळे सर्वच निर्णयांना प्रश्नचिन्ह लावायचे आणि त्याला पुरोगामीपणाचे बिरुदही लावायचे, असले उद्योग केले जातात. त्यामुळे करोना पूर्णपणे इतिहासजमा होईपर्यंत मंगल कार्यालय असो की सार्वजनिक ठिकाणं, करोनाचे निर्बंध कडकपणे अमलात आणणे, हे तुम्हाआम्हा सर्वांच्याच हिताचे आहे.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER