
आमिर खान (Aamir Khan’) सध्या त्याच्या लाल सिंह चड्ढा सिनेमाच्या निर्मितीत व्यस्त आहे. या सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून आमिरने सोशल मीडियापासून लाल सिंह चड्ढा रिलीज होईपर्यंत दूर राहाण्याचा निर्णय घेतला आहे. आमिरला बॉलिवूडमध्ये मि. परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाते त्यामुळे तो त्याचा प्रत्येक प्रोजेक्ट पूर्ण विचार करूनच तयार करतो. असे असताना त्याचा एक व्हीडियो सोशल मीडियावर शेयर झाला आणि काही क्षणातच तो प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडियोत आमिर खान चक्क एका क्लबमध्ये एका तरुण मुलीबरोबर डांस करताना दिसत आहे. लाल सिंह चड्ढाचे काम सोडून आमिर हे काय करीत आहे असा प्रश्न व्हीडियो पाहून सगळ्यांना पडला होता.
आमिर स्वतःच्या प्रोजेक्टमध्ये बिझी असताना तो दुसऱ्यांसाठी वेळ देत नाही. परंतु केवळ मैत्रीखातर त्याने स्वतःच्या सिनेमाचे काम थांबवले आणि मित्राच्या हाकेला ओ दिली. मित्राने पार्टीसाठी हाक मारली नव्हती तर त्याच्या सिनेमात एक आयटम साँग करण्यासाठी गळ घातली आणि आमिर मित्रासाठी तयारही झाला. आमिर खानचा मित्र अमिन हाजी प्रथमच दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहे. अमिन आणि आमिरने ‘लगान’ आणि ‘मंगल पांडे’मध्ये एकत्र काम केलेले आहे. त्याने कुणाल कपूर आणि अमाया दस्तूर यांना घेऊन ‘कोई जाने ना’ सिनेमाला सुरुवात केली आहे. आमिरने आयटम साँगला होकार देताच जयपुरमध्ये यासाठी क्लबचा एक भव्य सेट लावण्यात आला. या सेटवर आमिर खान आणि एली अवरामसोबत यांच्यावर आयटम साँगचे शूटिंग करण्यात आले. शूटिंग सुरु असताना कोणी तरी मोबाईलने त्याचे शूटिंग केले आणि तो व्हीडियो सोशल मीडियावर व्हायरल केला.
व्हीडियोत आमिर आणि एली अवराम उडत्या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. आमिर खानच्या स्टेप्स पाहून या वयातही आमिर खूप चांगला नाचू शकतो ते दिसून येते. या गाण्याला संगीत तनिष्क बागचीने दिले असून अमित भट्टाचार्यने गीत लिहिलेले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला