पिडीत मुलीच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल

victim filed a complaint against the girl's mother-father

रत्नागिरी /प्रतिनिधी :- छत्रपती शिवाजी स्टेडियमवर लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीच्या आईवडिलांविरूद्ध रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम आणि भीक मागण्यास प्रतिबंध कायद्यान्वये हा गुन्हा दाखल झाला आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी स्टेडियम या भागात गेल्या रविवारी आठ वर्षाच्या एका मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. धाकट्या दोन भावंडांसह स्टेडियममध्ये झोपलेल्या या मुलीला तिच्या आईने सोडून दिले होते. दुसऱ्या पतीने या मुलांची जबाबदारी घेण्यास नकार दिल्यामुळे महिलेने आपल्या तीन मुलांना सोडून दिले. ही मुले भीक मागून आपले पोट भरत होती. सदर महिला मुंबईहून आपल्या मुलांसोबत रत्नागिरीत आली. मात्र तिच्या प्रियकराने रात्री मुलांना रेल्वे स्थानकावरच ठेवले व दुसऱ्या दिवशी सकाळी मांडवी परिसरात नेऊन सोडले. त्यानंतर आई हरवलेली मुले म्हणून पोलीस तिच्या आईचा शोध घेत असताना ही महिला सापडली. मुले तिच्या ताब्यात देण्यात आली. त्यानंतर तिच्या प्रियकराने त्या मुलांना परत रेल्वे स्थानकावर नेऊन सोडले. दुसऱ्या दिवशी ही मुले छत्रपती शिवाजी स्टेडियमवर झोपली आणि तेथेच त्या बालिकेबाबत दुर्दैवी प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमाचे कलम ७५, ७६ आणि भीक मागण्यास प्रतिबंध अधिनियम १९५९च्या कलम ११ अन्वये योगेश पांडुरंग साळवी (कुंभारवाडी, करबुडे) आणि सुरेखा योगेश साळवी या दोघांवर रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.