‘अन्याय’ झाल्याच्या तक्रारीनंतर जाहीर केलेला निकाल केला रद्द

मद्रास हायकोर्टापुढील नाट्यपूर्ण घटना

Madras High Court

चेन्नई: राखून ठेवलेला निकाल व्हर्च्युअल पद्धतीने भरलेल्या खुल्या कोर्टात जाहीर केल्यानंतर प्रतिवादी पक्षकाराच्या वकिलाने ‘अन्याय’ झाल्याची तक्रार केल्याने तो जाहीर केला गेलेला निकाल मागे घेतला जाण्याची नाट्यपूर्ण घटना मद्रास उच्च न्यायालयापुढे (Madras High Court) शुक्रवारी सकाळी घडली. न्या. किरुबाकरन व न्या. बी. पुगलेंढी यांच्या खंडपीठापुढे एका अपिलावरील राखून ठेवलेला निकाल जाहीर करण्याचे  काम बोर्डावर पहिल्या क्रमांकावर होते. न्यायालयाचे व्हर्च्युअल कामकाज सुरू होताच न्या.

पुगलेंढी यांनी तयार असलेल्या निकालपत्रातील शेवटचा आदेशात्मक भाग थोडक्यात वाचून दाखविला. तो निकाल ऐकताच प्रतिवादींच्यावतीने काम पाहणाऱ्या एका महिला वकिलाने तिच्या अशिलांवर अन्याय केला गेल्याची जाहीरपणे तक्रार केली. न्यायालयाने आपले म्हणणे ऐकून न घेताच निकाल राखून ठेवला व आता तो आपल्या अशिलांविरुद्ध दिला गेला, असे त्या वकिलाचे म्हणणे होते.न्यायमूर्तींनी यास आक्षेप घेतला. ते त्या वकिलास म्हणाले की, निकाल राखून ठेवला तेव्हाच तुम्ही हे सांगितले असते तर ठीक होते. आता निकाल जाहीर झाल्यावर अशी तक्रार करणे योग्य नाही.

त्यावर ती  वकील म्हणाली की, न्यायालयाने अपीलकर्त्यांचे म्हणणे ऐकून झाल्यावर निकाल राखून ठेवण्याचे जाहीर केले. त्यावरून अपील फेटाळले जाईल, असा माझा समज झाला. त्यामुळे मी युक्तिवाद केला नाही. पण ती म्हणते ते खरे नाही हे दाखवण्यासाठी न्या.पुगलेंढी यांनी निकालपत्रातील संबंधित भाग वाचून दाखविला.

त्यात त्या वकिलाने केलेल्या युक्तिवादाची नोंद केली गेली होती. तरीही पक्षकाराच्या मनात अन्यायाची भावना राहू नये यासाठी न्यायमूर्तींनी जाहीर केलेले निकालपत्र, त्यावर स्वाक्षरी झालेली नसल्याने, मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले. सकाळी निकालपत्र जाहीर झाल्यावर घडलेल्या या सर्व घटनाक्रमाची लेखी नोंद करून खंडपीठाने सांगितले की, तक्रार करणाऱ्या त्या महिला वकिलास येत्या सोमवारी पुन्हा युक्तिवाद करण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर नव्याने निकाल दिला जाईल.

– अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER