गृहिणीच्या कामाचे मूल्य कमी लेखता येणार नाही

Court Oreder-Housewives

मुंबई :- कुटुंबातील गृहिणी (Housewife) घराबाहेर पडून अर्थाजन करत नाही म्हणून तिच्या कामाला कमी लेखता येणार नाही किंवा त्यास काहीच मूल्य नाही असेही मानता येणार. उलट कुटुंबात गृहिणी पत्नी व माता म्हणून जे अहोरात्र कष्ट करत असते त्याचे मूल्य खरे तर पैशाच्या रूपाने ठरविणे कठीण आहे. म्हणूनच अशा एखाद्या गृहिणीचा अपघाती मृत्यू झाल्यास ती केवळ गृहिणी होती म्हणून तिच्या पतीला व मुलांना भरपाई नाकारली जाऊ शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay HC) दिला आहे. अमरावती जिल्ह्याच्या चिखलठाणा तालुक्यातील टेंबूरसोंदा गावातील रामभाऊ गवई या मजुराने व त्यांच्या दोन मुलांनी केलेल्या अपिलावर मुंबई (Mumbai) उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश न्या. अनिल एस. किलोर यांनी हा निकाल दिला.

जीपने परगावी जात असताना तिला अपघात होऊन रामभाऊंची पत्नी बेबी हिचे निधन झाले होते. त्याबद्दल जीपचा मालक व विमा कंपनीकडून भरपाई मिळावी यासाठी रामभाऊ व मुलांनी केलेली याचिका अचलपूर येथील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने फेटाळली होती. बेबी कोणतीही कमाई न करणारी गृहिणी होती. त्यामुळे तिच्या अपघाती मृत्यूबद्दल तिचे पती भरपाई मिळण्यास पात्र नाहीत, यासह इतरही मुद्द्यांवर न्यायाधिकरणाने रामभाऊंचा दावा फेटाळला होता. अपिलात न्या. किलोर यांनी न्यायाधिकरणाचा हा निकाल सुप्रस्थापित कायद्याला धरून नसल्याने रद्द केला. न्या. किलोर यांनी म्हटले की, गृहिणी असलेल्या महिला कुटुंबात खरं तर खूप आव्हानात्मक व महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात; पण त्यांच्या या कामाला सर्वसाधारणपणे किंमत ठेवली जात नाही.

ही गृहिणी भावनिकदृष्ट्या सर्व कुटुंबाला एकत्र बांधून ठेवत असते. पतीसाठी ती मोठा आधारस्तंभ असते, मुलांची मार्गदर्शक असते तर घरातील वृद्धांचा आधार असते. न्या. किलोर म्हणतात की, अशी ही गृहिणी जरी घराबाहेर जाऊन नोकरी करणारी असली तरी घरासाठी मात्र ती कधीही सुटी न घेता अहोरात्र राबत असते. गृहिणी घरासाठी व घरात जी शेकडो प्रकारची कामे करत असते त्याचे मोल पैशात मोजणे अशक्य आहे.

त्यामुळे मोटार अपघात भरपाईच्या प्रकरणात अशा गृहिणीच्या मृत्यूने पती आणि मुले तिच्या ज्या प्रेमाला व काळजीला पारखी होतात त्या आधारे भरपाईचा हिशेब करायला हवा. सर्वोच्च न्यायालयाने १० वर्षांपूर्वी अशाच प्रकरणांमध्ये सविस्तर ऊहापोह करून अपघात भरपाई प्रकरणात नोकरी न करणाऱ्या  ३४ ते ५९ या वयोगटातील गृहिणीचे ‘उत्पन्न’ महिन्याला सरासरी तीन हजार रुपये गृहीत धरावे असे ठरविले होते.

प्रस्तुत प्रकरणात मयत झालेली बेबी गृहिणी म्हणून गृहकृत्ये करण्याखेरीज बाहेर मोलमजुरी करून दिवसाला १०० रुपये कमावणारी होती. हे लक्षात घेऊन न्यायालयाने एकूण ८.२२ लाख रुपये भरपाई मंजूर केली. अपघात झाला तेव्हा जिपच्या चालकाकडे वैध ड्रायव्हिंग लायसेन्स नव्हते. शिवाय खासगी जीप भाड्याने चालविली जात होती. त्यामुळे आम्ही भरपाई द्यायला बांधील  नाही, असा पवित्रा विमा कंपनीने घेतला होता. मात्र ते अमान्य करताना न्यायालयाने म्हटले की, विमा कंपनीने भरपाईची रक्कम आधी स्वत: द्यावी व नंतर वाटल्यास जिपच्या मालकाकडून ती वसूल करावी. हा निकाल फर्स्ट अपिल ५१०/२००७ या प्रकरणfत दिला गेला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER