बाप्पाच्या आगमन सोहळ्यात ड्रोनचा वापर

use of drones at Bappa's arrival ceremony

मुंबई :- मुंबईत ड्रोनबंदी असताना, गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्याच्या चित्रिकरणासाठी ड्रोनचा वापर करणे ताडदेवमधील दोन तरुणांना भलतेच महागात पडले. आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताडदेव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई सुचिंद्र कदम यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. १७ जुलै ते २० आॅगस्टदरम्यान पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार मुंबईत पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोल, एअरमिसाइल, ड्रोन उड्डाण करण्याबाबत बंदी घालण्यात आली होती. याबाबत सर्वांना सूचनाही देण्यात आल्या होत्या. १८ आॅगस्टला साडेनऊच्या सुमारास ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ या गणपती मंडळाच्या बाप्पाच्या आगमन सोहळ्यादरम्यान ड्रोनद्वारे चित्रीकरण होत असल्याचे दिसून आले. बने कम्पाउंडच्या एच इमारतीवरून दोघे जण ड्रोन उडवत होते. या प्रकरणी पोलिसांनी सिद्धेश चंद्रकांत गुंड्ये (२३) याच्यासह एका अल्पवयीन तरुणाकडून ड्रोन जप्त केला. ड्रोन त्यांच्याच मालकीचा होता. मात्र ड्रोन उडविण्याबाबत कुठलाही परवाना नसताना त्यांनी या ड्रोनचा वापर केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.