कोरोना संकटकाळात भुजबळ नॉलेज सिटीने तयार केलेले अद्ययावत कोविड सेंटर इतर संस्थांना प्रेरणादायी- शरद पवार

COVID Care Center - Sharad Pawar
  • पंचवटी येथील भुजबळ कोविड केअर सेंटरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन
  • राज्यातील विविध संस्थांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी पुढे यावे- छगन भुजबळ
  • कोविड केअर सेंटरमध्ये १८० ऑक्सिजन व ११५ सीसीसी बेड्सची व्यवस्था

नाशिक : कोरोनाच्या (Corona) संकटात रुग्णांच्या मदतीसाठी त्यांना आधार देणारे वैशिष्ट्यपूर्ण व नावीन्यपूर्ण असे ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था असलेले कोविड केअर सेंटर (COVID Care Center) राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वाखाली भुजबळ नॉलेज सिटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नाशिकमध्ये तयार केले आहे. भुजबळांनी हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा असून हे कोविड केअर सेंटर राज्यातील इतर संस्थांना कोरोनाच्या लढाईत काम करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी व्यक्त केला.

नाशिक येथे मेट भुजबळ नॉलेज सिटी व महानगरपालिका , नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या सहकार्याने विभागीय क्रीडा संकुल,नाशिक येथे १८० ऑक्सिजन व ११५ सीसीसी अशा एकूण २९५ बेड्सची व्यवस्था असलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन स्वरूपात पार पडले.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक डॉ.प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, मुख्याधिकारी लीना बनसोड, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात,शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले,दिलीप खैरे ,बाळासाहेब कर्डक,अंबादास खैरे, कविता कर्डक, गौरव गोवर्धने, कैलास मुदलियार यांच्यासह डॉक्टर्स, कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते.

स्वयंसेवी संस्थांनी आजवर तयार केलेले कोविड सेंटर विलगीकरण व्यवस्था म्हणून तयार करण्यात येत होते. मात्र छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिकमध्ये ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता असलेले नावीन्यपूर्ण कोविड सेंटर उभे राहात आहे. या कोविड केअर सेंटरमधून संकटग्रस्त रुग्णांना मदतीसाठी मोठा आधार मिळेल, असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

कोविडचे मोठे संकट देशावर आणि राज्यावर असून यातून बाहेर पडण्यासाठी सर्व संस्था, संघटनांची मदत आवश्यक असून त्यांनी यामध्ये पुढे येण्याची आवश्यकता आहे. नाशिकमध्ये भुजबळ नॉलेज सिटीने तयार केलेल्या कोविड सेंटरचा आदर्श घेऊन राज्यात इतर ठिकाणीदेखील शक्य असेल तेवढे कोविड सेंटर निर्माण करण्यात यावे असे आवाहन करत राज्यातील सहकारी आणि स्वयंसेवी विविध संस्था या नाशिकमधील या कोविड सेंटरची प्रेरणा घेतील, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.

नाशिकमध्ये कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने बेडची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे रुग्णालयांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मेट भुजबळ नॉलेज सिटी व महानगरपालिका, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या सहकार्याने विभागीय क्रीडा संकुल,नाशिक येथे १८० ऑक्सिजन व ११५ सीसीसी अशा एकूण २९५ बेड्सची व्यवस्था असलेल्या कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे इतर रुग्णालयांवरील ताण कमी होणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

कोविडचे मोठे संकट आपल्यासमोर उभे राहिले असून राज्यातील उद्योजक, साखर कारखानदार, शैक्षणिक संस्था, समाजसेवी संस्थांनी कोरोनाच्या लढाईत योगदान द्यावे, असे आवाहन छगन भुजबळ यांनी यावेळी केले. त्यांनी या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची माहिती शरद पवार यांना दिली. तसेच आभार व्यक्त केले.

या सदर कोविड सेंटरमध्ये १८० बेड्ससाठी ऑक्सिजन लाईनची स्वतंत्र जोडणी केलेली आहे. या ऑक्सिजन लाईनचे मटेरियल सुरत येथून मागवून ही ऑक्सिजन लाईन उभारण्यात आली आहे.ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आवश्यक असलेले वेपोरायझर बडोदा, गुजरात येथून आणण्यात आले आहे. ऑक्सिजन व्यवस्थेसाठी लागणारे ड्युरा सिलिंडर वेल्लूर, कर्नाटक येथून आणण्यात आले आहेत तर पुरेशा ऑक्सिजन साठ्यासाठी आवश्यक असलेले १ केएल क्षमतेचे ऑक्सिजन टँक पुणे येथून आणले आहे. १८० रुग्णांना सतत पुरेल एवढा ऑक्सिजनचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रुग्णांच्या सोयीसाठी दिल्ली येथून ५० एअर कूलर मागवून या ठिकाणी बसविण्यात आलेले आहे. सर्व बेड्सवर स्वतंत्र ऑक्सिमीटर आहे. सर्जन डॉ.अभिनंदन जाधव यांच्यासह ६ एमबीबीएस व ४ बीएचएमएस असे ११ डॉक्टर तसेच १५ प्रशिक्षित परिचारिकांची नेमणूक करण्यात आली आहे. या कोविड सेंटरसाठी एक अॅडमीन, तीन फार्मसी ऑफिसर, पाच रिसेप्शनिस्ट, १५ वार्ड बॉय, १० सिक्युरिटी गार्ड भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे डॉक्टर तसेच नाशिकमधील नामांकित फिजिशियन डॉ. शीतल गुप्ता आणि डॉ.अतुल वडगावकर यांचेही सहकार्य लाभणार आहे. रुग्णांना ने-आण करण्यासाठी किंवा संदर्भित करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

या ठिकाणी रुग्णांना औषध उपचारासह दोन वेळचे पौष्टिक जेवण, अंडी आणि नाश्ता,फळांचा रस,चहा, रात्रीचे हळदयुक्त दूध, शुद्ध पिण्याचे पाणी इत्यादी सोयीसुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याचसोबत रुग्णांच्या विरंगुळ्यासाठी वाचनालय व बुद्धिबळ, कॅरम इत्यादी खेळ, कलाप्रेमींसाठी चित्रकलेची व्यवस्था यांसह करमणुकीसाठी तीन मोठे स्क्रीन तसेच दोन दूरदर्शन संच आणि चार मोबाईल चार्जर युनिट यांसारख्या सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. मोठ्या स्क्रीनवर सकाळी योगा व प्राणायामाचे प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर मधुर संगीत, चित्रपट, सध्याच्या घडामोडी यासह सायंकाळी आयपीएल क्रिकेटच्या मॅचेस दाखविण्यात येणार आहेत. जेणेकरून रुग्णांचे मनोरंजन होऊन त्यांचा मानसिक ताण कमी होईल. तसेच आजाराची भीती दूर होण्यासाठी मदत होणार आहे.

नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये कोविड रुग्णांची प्रचंड संख्या लक्षात घेता शहरातील हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाही. कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हॉस्पिटलचा ताण कमी करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी या कोविड सेंटरचा पर्यायी व्यवस्था म्हणून उपयोग होणार आहे. येथील काही ७० टक्के बेड्स पुरुषांसाठी तर ३० टक्के बेड्स महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button