रेडिमेड फराळाची उलाढाल वाढली 25 टक्क्यांनी

Ready Made Farar

कोल्हापूर : दिवाळी (Diwali) सण सुरू झाला असून व्यावसायिक, गृहिणी, महिला बचत गटाकडून करण्यात येणाऱ्या फराळाची मागणी वाढली आहे. काही ठिकाणी दरात तफावत असल्याचे दिसत असले तरी दिवाळीच्या निमित्ताने रेडिमेड फराळाची उलाढाल 25 टक्क्यांनी वाढली असून व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अनेक हॉटेल व्यावसायिक यांच्यासह बचत गटांनी रस्त्यावर व चौका-चौकात फराळाचे स्टॉल मांडले आहेत. शहरासह जिल्ह्यात 400 हून अधिक फराळ उत्पादक आहेत. कोरोनामुळे काही पदार्थ घरी बनवायचे व काही रेडिमेड घेण्याकडे गृहिणींचा कल दिसत आहे. यंदा किराणासह सर्वच वस्तू महागल्याने फराळाच्या किमतीत थोडीफार वाढ झाली आहे. फराळ बनविणारे व फराळ घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

चिवडा, चकली, करंजी, शंकरपाळी, पातळ पोहे चिवडा, बेसन लाडू, रवा लाडू, बुंदी लाडू, डिंक लाडू, खाजा, बालुशाही, अनारसे, सोन पापडी, म्हैसूर पाक, बाकरवडी आदी रेडिमेड फराळाची बाजारातील मागणी वाढली आहे. कोल्हापुरातील काही व्यावसायिकांनी सातासमुद्रापार फराळाचे पदार्थ कुरिअरने पाठविले आहेत. फराळाचे पदार्थ वेगळ्या पद्धतीने बनवून त्याची सोशल मीडियावर माहिती प्रसिद्ध करून व्यावसायिकांनी विविध देशांतून ऑर्डर मिळविल्या आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील फराळ आंतराष्ट्रीय स्तरावर पोहोचला असून उलाढालदेखील होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER