लग्नापेक्षा ट्रिप सोपी

Prajakta Mali

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिच्या सोशल मीडिया (Social Media) पेजवर नजर टाकली तर सध्या ती हिमाचलप्रदेशात असल्याचं दिसत आहे. हिमाचलप्रदेशातील वेगवेगळ्या पर्यटनस्थळांना  भेट दिल्याचे आणि तिथल्या जेवणावर ताव मारत असल्याचे फोटो सध्या प्राजक्ताने शेअर केले आहेत. सेलिब्रिटीचं स्टेटस काय आहे हे त्यांच्या चाहत्यांना नेहमीच हवं असतं. त्यामुळे प्राजक्ताचे चाहतेदेखील ती सध्या कुठे आहे व ती सध्या काय करत आहे याकडे डोळे लावून बसलेले असतात. प्राजक्ता त्यांना नाराज न करता तिचे सगळे अपडेट देत असते. त्यामुळे सध्या तरी प्राजक्ताच्या हिमाचलप्रदेशमधील भटकंतीची चर्चा आता तिच्या चाहत्या वर्गात जोरदार सुरू आहे. प्राजक्ता फिरायला गेली एवढ्याच गोष्टीची चर्चा नाही तर, या फोटोसोबत तिने अजून खूप काही शेअर केले आहे. त्यामुळे प्राजक्ताच्या सेन्स ऑफ ह्युमरचीदेखील चांगलीच चर्चा सोशल मीडिया वर्तुळात रंगली आहे.

लॉकडाऊननंतर परिस्थिती निवळायला लागली आणि अनलॉक सुरू झालं. या काळात सेलिब्रिटीज जगात अनेक कलाकारांच्या लग्नाचा बार उडू लागला आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये ८ ते १० सेलिब्रिटी कपल विवाहबंधनात अडकले. एका कलाकाराच्या लग्नाचं कवित्व संपतं न संपतं तोवर दुसरा सेलिब्रिटी बोहल्यावर चढत असल्याचं आपण सर्वांनीच पाहिला आहे. सेलिब्रिटी कलाकारांच्या लग्नाची रंगत अजूनही सुरूच आहे.

मराठी सिनेमा, मालिका आणि नाटक या तीनही क्षेत्रांत  लक्षवेधी काम करत असलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी गेल्या काही दिवसांपासून अनेक फोटो सोशल मीडिया पेजवर शेअर करत आहे. त्यामुळे तिला तिच्या चाहत्यांकडून, ती लग्न कधी करणार, असा प्रश्न विचारला जात नसेल तरच नवल ! काही दिवसांपूर्वी तिने तिला भाची झाल्याची बातमी शेअर केली होती. त्यानंतरही अभिनंदनासोबतच चाहत्यांनी प्राजक्ताआत्या कधी लग्न करणार, असं विचारलं होतं. चाहत्यांकडून येणाऱ्या लग्नाबद्दलच्या प्रश्नांना प्राजक्ताने फार सिरीयसली घेतलं नसलं तरी मध्यंतरी तिने तिच्या मनातील जोडीदाराचं वर्णन केलं होतं. जो मुलगा माझ्या अभिनय कौशल्याला वाव देईल आणि माझ्या करिअरला पाठिंबा देईल, अशा मुलाशी लग्न करणार असल्याचं प्राजक्तानं सांगितलं होतं. त्यानंतर अजून तरी तिला तिच्या मनातला जोडीदार मिळाला नसल्याने तिने तूर्तास लग्नाचा विषय बाजूला ठेवला आहे. हिमाचलप्रदेशमधील भटकंतीच्या फोटोसोबत प्राजक्ताचे कॅप्शन लक्ष वेधून घेत आहेत. प्राजक्ता सांगते की, गेल्या काही दिवसांत माझ्या मराठी सिनेमा, मालिका आणि नाटक इंडस्ट्रीमधल्या अनेक कलाकार मित्रमंडळीची लग्न होत असल्याचं मी बघते आहे. सध्या कलाकार एक तर लग्न करत आहेत किंवा फिरायला जात आहेत. मी सध्या तरी लग्न करू शकत नाही; कारण अजून मला हवा तसा जोडीदार मिळालेला नाही. मग मी काय करू शकते ? भटकंती करू शकते. म्हणून मी हिमाचलप्रदेशला मस्त मजा करण्यासाठी आलेली आहे, असं म्हणत तिने एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा शहाणपणा केला आहे. अनेकदा काही फोटो टाकले की, माझा विषय माझ्या लग्नावर येऊन घसरतो. त्यामुळे मी हिमाचलप्रदेशमधल्या भटकंतीचे फोटो शेअर करत असतानाच सध्या मी लग्न करणार नाही हे सांगूनच टाकले आहे.

प्राजक्ताच्या या दिलखुलास कमेंटवर तिचे चाहते बेहद खूश झाले आहेत. आता प्राजक्ता ती कधी लग्न करणार हे स्वतः सांगत नाही तोपर्यंत तिचे नेटकरी फॅन्स तिला काही विचारणार नाहीत याचा पुरता बंदोबस्त प्राजक्ताने करून ठेवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER