हे त्रिकूट म्हणणार ‘सोपं नसतं काही’

Shashank Ketkar-Mrinmayi Deshpande-Abhijit Khandkekar

एखादी गोष्ट जेव्हा खूप कष्ट करून मिळवली जाते आणि त्यानंतर मागे वळून पाहताना सोपं नसतं काही हे वाक्य नेहमी ऐकायला मिळतं. आपल्या आजूबाजूच्या संवादात हे वाक्य आपण कित्येकदा ऐकतो, पण जेव्हा हा अनुभव सेलिब्रिटी कलाकार ऑनस्क्रिन मांडतात तेव्हा त्याचा एक सिनेमा बनतो. आयुष्यात खरच काहीच सोपं नसतं या उक्तीचा प्रत्यय मनोरंजनक्षेत्रात करिअर करण्यासाठी धडपणाऱ्या कलाकारांना प्रकर्षाने येतो. त्यात गेल्या वर्षभरात लॉकडाउनमुळे सिनेमे, मालिका, नाटक ही तिन्ही माध्यमं लॉक झाली ते पाहता कलाकारांनी यातून बराच धडा गिरवला आहे. आता याच वाक्याची अनुभूती देण्यासाठी सेलिब्रिटी कलाकारांमधील एक त्रिकूट लवकरण पडद्यावर भेटायला येणार आहे. अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar), अभिजित खांडकेकर (Abhijit Khandkekar) आणि मृण्मयी देशपांडे (Mrinmayi Deshpande) ही त्रिफळी नेमकं काय सोपं नसतं हे एका वेबसिरीजमधून सांगणार आहे.

गेल्या काही दिवसात सिनेमा, नाटक, मालिका यापाठोपाठ कलाकांराना वेबसिरीज हे माध्यमही खुणावत आहे. डिजिटलयुगात मनोरंजनक्षेत्र प्रेक्षकांच्या मुठीत आलं आहे ते स्मार्टफोनमुळे. शिवाय प्रत्येकासाठी वेळ खूप महत्त्वाचा झाला आहे. तीन तासांचा सिनेमा दोन तासांवर आलाच आहे, त्यापुढे जात आता पाच ते सहा एपिसोडची वेबसिरीज पाहणारा प्रेक्षकही तयार आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यापेक्षा सध्याचे सेलिब्रिटी कलाकार वेबसिरीजमध्ये काम करण्याची संधी सोडत नाहीत.

दोन दिवसांपासून सोशलमीडियावर (Social Media) एक पोस्ट व्हायरल होतेय. त्यामध्ये असं म्हटलंय की, शशांक केतकर ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेतून ब्रेक घेणार. मालिकेचा खलनायक असला तरी प्रमुख व्यक्तीरेखा असलेल्या शशांकच्या ब्रेकची चर्चा तर होणारच ना. तर शशांकला ब्रेक हवा आहे तो ‘सोपं नसतं काही’ याच वेबसिरीजच्या शूटिंगसाठी. लवकरच या वेबसिरीजचे शूटिंग सुरू होणार असल्याने शशांकने त्याच्या सध्या गाजत असलेल्या ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेचे एपिसोड आधीच शूट केले आहेत. शशांकने यापूर्वी तीन मालिका केल्या असून दोन सिनेमातही काम केले आहे. शिवाय प्रायोगिक व व्यावसायिक नाटकांच्या निमित्ताने त्याने रंगभूमीही गाजवली आहे. वेबसिरीजमध्ये आता तो लवकरच दिसणार आहे.

तब्बल चार वर्षे कधी ट्रोलिंग, कधी मीम्स तर कधी अव्वल टीआरपीमुळे चर्चेत राहिलेल्या माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका संपली असली तरी या मालिकेतील खलनायक रंगवलेला गुरूनाथफेम अभिजित खांडकेकर हा देखील ‘सोपं नसतं काही’ या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेने लोकप्रिय खलनायक म्हणून घराघरात पोहोचलेला अभिजित खांडकेकर चाहूल गुन्हेगाराची या शोचा सूत्रधारही बनला आहे. मुळात रेडिओजॉकी म्हणून काम करत अभिनयाच्या प्रांतात आलेल्या अभिजितकडे निवेदनाचीही उत्तम शैली आहे. अभिजितच्या चाहत्यांनाही त्याला नव्या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

कुंकू या मालिकेतून एका राजकीय नेत्याचे व्यक्तीगत आयुष्य उलगडून दाखवणाऱ्या मालिकेतून अभिनयक्षेत्रात आलेल्या मृण्मयी देशपांडे हिने गेल्या एक तपात वैविध्यपूर्ण भूमिका केल्या आहेत. अभिनयच नव्हे तर तिने दिग्दर्शनातही पाऊल टाकत मन फकीरा या सारखा वेगळा विषय मांडला. सध्या ती मालिकांपासून लांब असली तरी मध्यंतरी मृण्मयीने केलेल्या सिनेमांच्या निवडीवरून तिच्यातील चोखदळ अभिनेत्री प्रेक्षकांना आवडली आहे. कटय़ार काळजात घुसली या सिनेमातील तिचा अभिनय असो किंवा मिस यू मिस्टर या सिनेमातील तिने वठवलेली आजच्या काळातील बायको केवळ अप्रतिम. मृण्मयी उत्तम डान्सरही आहे. काहीतरी नवीन करण्यासाठी नेहमीच आतूर असलेल्या मृण्मयीलाही या वेबसिरीजमध्ये पाहणे ही तिच्या चाहत्यांसाठी ट्रीट असणार आहे.

शशांक, अभिजित आणि मृण्मयी या आजच्या स्टार कलाकारांनी वेबसिरीजच्या माध्यमातून एकत्र येत सोपं नसतं काही हे सांगायचे ठरवले आहे खरे, पण नेमकं काय सोपं नसतं हे त्यांच्याकडून ऐकण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पहावी लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button