उद्या कंगनाच्या वाढदिवशी ‘थलाईवी’चा ट्रेलर मुंबई आणि तामिळनाडूत होणार रिलीज

Maharashtra Today

कंगना रनौत (Kangana Ranaut) एकीकडे सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्ये करून धुमाकूळ घालत आहे तर दुसरीकडे रुपेरी पडद्यावरही विविध प्रकारच्या भूमिकाही साकारीत आहे. गेल्या काही वर्षांपासून तर कंगना एखाद्या नायकाप्रमाणे स्वतःच्या खांद्यावर संपूर्ण सिनेमा तोलून धरते त्यामुळे निर्माते तिच्याकडे नायिकाप्रधान सिनेमाच्या ऑफर घेऊन जातात. कंगना सिनेमात असली म्हणजे तो हिट होतोच असेही निर्मात्यांना वाटत असते. कंगनाने गेल्या काही काळात साईन केलेले किंवा पूर्ण केलेले सिनेमे पाहिले की याची खात्री पटते. अशाच काही सिनेमांपैकी एक सिनेमा आहे ‘थलाईवी’ (Thalaivi). या सिनेमाचा पहिला ट्रेलर उद्या म्हणजे मंगळवारी रिलीज केला जाणार असून कंगनाला निर्मात्यांकडून तिच्या वाढदिवसाची अनोखी भेट दिली जाणार आहे.

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता (J. Jayalalithaa) यांच्या जीवनावर आधारित ‘थलाइवी’ सिनेमा असून यात कंगना रनौत जयललिता यांची भूमिका साकारीत आहे. खरे तर गेल्या वर्षीच या सिनेमाचे काम पूर्ण केले जाणार होते पण कोरोनाने सिनेमाच्या शूटिंगला ब्रेक लावला होता. लॉकडाऊन उठल्यानंतर कंगनाने लगेचच तामिळनाडूला धाव घेत हा सिनेमा पूर्ण केला. सिनेमाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘थलाईवी’ सिनेमाचा ट्रेलर कंगनाच्या वाढदिवशी एकाच वेळी मुंबई आणि तामिळनाडूत रिलीज केला जाणार आहे. यासाठी रविवारपासूनच तयारी सुरु करण्यात आली आहे.

‘थलाइवी’चा दिग्दर्शक विजयने सांगितले, “कोट्यवधी लोकांची प्रेरणास्रोत राहिलेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची अमर गाथा दाखवणारा हा सिनेमा आहे. जयललिता हे उत्तुंग व्यक्तिमत्व होते त्यामुळे त्यांच्या सिनेमाच्या ट्रेलरचा समारंभही भव्यपणे करण्याचा आमचा विचार आहे. जयललित फक्त तामिळनाडूतच लोकप्रिय होत्या असे नाही तर संपूर्ण भारतात त्यांचे नाव घेतले जाते. त्यामुळेच आम्ही चेन्नई आणि मुंबईत ट्रेलर रिलीज करण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.” विजयने पुढे सांगितले, “कंगना अद्भुत अभिनेत्री आहे. प्रत्येक भूमिका ती जीव ओतून उत्कृष्टपणे साकारते. आमच्या या ‘थलाइवी’ सिनेमासाठी तिने जी मेहनत घेतली आहे त्याला तोड नाही. कंगनाने पडद्यावर हुबेहूब जयललिता साकारली आहे. तिने या भूमिेकला संपूर्ण न्याय दिला आहे असे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. मंगळवारी तिचा वाढदिवस असल्याने या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन आम्ही सिनेमाचा ट्रेलर रिलीज करणार आहोत.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER