तिरुपतीचे मंदिर ८ जूनपासून दर्शनासाठी होणार खुले

The Tirupati temple will be open for Darshan from June 8

तिरुमला : तिरुपतीचे मंदिर सोमवार ८ जूनपासून दर्शनासाठी सशर्त खुले होणार आहे. ८० दिवसांनंतर भक्त हे देवाचे दर्शन घेऊ शकतील. सध्या ‘ज्येष्ठ अभिषेकम्’ हा तीन दिवसांचा उत्सव मंदिरात सुरू आहे, अशी माहिती तिरुमला तिरुपती देवस्थान मंडळाचे मुख्य तसेच या मंडळाचे कार्यकारी अधिकारी अनिल कुमार यांनी पत्रपरिषदेत दिली.

मंदिर सकाळी ६.३० ते ७.३० या वेळेतच भक्तांसाठी खुले राहील. रोज फक्त ५०० भक्तांना प्रवेश देण्यात येईल. देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही प्रायोगिक तत्त्वावरच दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाईल. ज्यांनी ८ आणि ९ जूनसाठी इंटरनेटवरून दर्शनाची वेळ निश्चित केली आहे त्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाईल. ८ आणि ९ जूनला दर्शन घेण्यासाठी ६ आणि ७ जून रोजी इंटरनेटवर नोंदणी करता येईल. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि १० वर्षांखालील मुलांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही.

१० जूनपासून टाइम स्लॉट टोकन्स तिरुमला येथील भाविकांना वाटली जातील. एका तासात ५०० भाविक ही अट राहील. १ जूनपासून ३०० रुपये मूल्य असलेली तीन हजार तिकिटं तिरुमला तिरुपती देवस्थानच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन तिकिट बुकिंगचा कोटा ८ जूनपासून सुरू होईल. बाहेरून येणाऱ्या भक्तांना तिकिटे ऑनलाईन बुक करता येतील. त्यांना स्वयंसेवक तिकीट बुक करण्याबाबत मार्गदर्शन करतील. ११ जूनपासून व्हीआयपी दर्शनही सुरू होईल. त्याचेही बुकिंग आधी करावे लागेल. मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तिरुपती येथे कोविड-१९ च्या रोज २०० चाचण्याही केल्या जाणार आहेत. सध्याच्या घडीला तीन दिवसांचा विधी असलेला ज्येष्ठ अभिषेकम् हा तिरुपती बालाजी मंदिरात सुरू करण्यात आला आहे, असंही मंदिर समितीनं स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER