एकमेकांचे कार्यकर्ते ओढताहेत महाविकास आघाडीतील तीन पक्ष

Mahavikas Aghadi - महाविकास आघाडी

काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या प्रमुख उपस्थितीत इतर पक्षांमधील काही कार्यकर्ते, स्थानिक नेत्यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. थोरात यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील हे नेते आहेत. त्यातील काही भाजपचे तर काही राष्ट्रवादी काँग्रेसचेदेखील आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांना इतर तीन पक्षांनी फोडणे हे समजले जाऊ शकते; पण महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) मित्र पक्षच एकमेकांचे कार्यकर्ते पळवत आहेत. राष्ट्रवादीकडून याबाबत काँग्रेस आणि शिवसेनेलादेखील मोठा धोका आहे.

आता असे सांगितले जात आहे की, भाजपचे (BJP) मोठमोठे नेते लवकरच पक्षांतर करतील. हे भाजपवाले आमच्याचकडे येणार असे काँग्रेस, शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादीवालेही (NCP) सांगत आहेत. आमच्यातून कोणीही कुठे जाणार नाही. सध्या महाविकास आघाडीतच अस्वस्थता आहे आणि त्या अस्वस्थतेतूनच भाजपचे लोक फुटणार असल्याच्या बातम्या पसरविल्या जात आहेत, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कालच स्पष्ट केले आहे. शिवसेनेचे नेते  संजय राऊत यांनी मंगळवारी एक पत्रपरिषद मुंबईत घेऊन लवकरच राज्यात राजकीय भूकंपाचे मोठे धक्के बसतील आणि त्याचा केंद्रबिंदू हा शिवसेना भवन असेल असा दावा केला. त्यांचा हा दावा किती खरा किती खोटा हे लवकरच कळेल.

सत्तेत दोन पक्षांनी एकमेकांना सामावून घेताना कसरत होते. आज महाराष्ट्रात तीन पक्षांचे खिचडी सरकार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना सत्तेची पदे देणे शक्य होणार नाही. तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे राजकीयदृष्ट्या सामावून घेणे अशक्य आहे. महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकांत याचा प्रत्यय येईल आणि महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची युती झाली तरी मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक नाराजवीर तयार होतील. अशा वेळी विरोधी पक्षाची संपूर्ण स्पेस व्यापणाऱ्या भाजपशिवाय नाराजवीरांना पर्याय नसेल. अंतर्विरोध आणि परस्पर अविश्वासाने महाविकास आघाडीला ग्रासल्याशिवाय राहणार नाही. तीन भिन्न प्रवृत्तीचे पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते एकत्रित फार दिवस नांदू शकणार नाहीत, असे राजकीय जाणकारांना वाटते.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पंतप्रधान करण्याचे स्वप्न राऊत यांनी बाळगले आहे आणि काही महिन्यांपूर्वी त्यांनी उद्धवजींनी देशाचे नेतृत्व करावे, त्यांच्यात ती क्षमता आहे असे म्हटले होते. मंगळवारी पत्रकारांशी बोलतानादेखील त्यांनी उद्धवजी देशाचे पंतप्रधान होतील, असे भाकीत वर्तविले. उद्धव ठाकरे कशाच्या भरवशावर पंतप्रधान होणार हे काही त्यांनी सांगितले नाही. अतार्किक बोलले की मग त्यावर तर्क देण्याची गरज नसते. मुळात आता सध्या शिवसेनेचे १८ खासदार लोकसभेत आहेत. गेल्या वेळी भाजपसोबत युती असल्याने एवढ्या जागा मिळाल्या हे वास्तव कोणीही नाकारणार नाही. आता २०२४ च्या निवडणुकीत या यशाची पुनरावृत्ती होईल का हा यक्षप्रश्न आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) एक ना एक दिवस पंतप्रधान होतील, असा आशावाद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना असतो. आता तो आशावाद संजय राऊत यांना उद्धव यांच्याविषयी वाटू लागला आहे.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेत अनेक पक्षाचे कार्यकर्ते दाखल : संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER