धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही ; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray

मुंबई :- महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खास मुलाखत घेतली . या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, असेही ते पत्रकार परिषदेत म्हणाले. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्ताने भाजपने पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर ताशेरे ओढले .

महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. मात्र अचिव्हमेंट काय आहे? मुख्यमंत्र्यांनी सामनाला मुलाखत दिली; पण त्यामध्ये वर्षपूर्तीचा आढावा हवा होता, प्रश्न कसे सोडवणार, याबद्दलचं व्हिजन आवश्यक होतं, मात्र ते दिसलंच नाही. मुलाखतीत फक्त धमक्या दिसल्या. मुख्यमंत्री संयमी आहेत हे ऐकून होतो; पण दसरा मेळाव्याचं भाषण असो की कालची मुलाखत यातून ते संयमी नसल्याचं दिसून आले , अशी टीका फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केली.

हात धुऊन मागे लागू, खिचडी शिजवू, ही कोणती भाषा? तुम्ही सांविधानिक पदावर आहात. अशा प्रकारची भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. या मुलाखतीत विकासावर अजिबात चर्चा नाही. चर्चा कशावर तर कुणाच्या मागे हात धुऊन लागू आणि कुणाची खिचडी शिजवू यावर मुलाखतीचा भर होता. ही मुलाखत मुख्यमंत्रिपदाला शोभणारी नव्हती, असे फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची कालची मुलाखतीतली भाषा म्हणजे अशी भांडणं नाक्यावर होतात. वर्षपूर्तीच्या निमित्ताने होत नाहीत, असं सांगत अशा प्रकारे चिरडण्याची भाषा ज्यांनी ज्यांनी केली ते फार काळ टिकले नाहीत, असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

पत्रकार अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) आणि अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) यांच्या प्रकरणाचे निकाल लागण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत आली हे बरं झालं. नाही तर ही मुलाखत म्हणजे न्यायालयाचा अवमान ठरला असता. आम्ही अर्णब आणि कंगनाच्या प्रत्येक मताशी सहमत नाही. मात्र विरोधी विचारांना चिरडूनच टाकायचं याच्याशी तर आम्ही अजिबातच सहमत नाही, असे फडणवीस म्हणाले.

कोरोनाची (Corona) दुसरी लाट देशातील काही भागांतच आहे. महाराष्ट्रात नाही हे सुदैव असल्याचे फडणवीस म्हणाले.

मी म्हणेल की राज्य सरकारचं एका वर्षातलं काम म्हणजे स्थगिती. आमच्या अनेक योजनांना त्यांनी स्थगिती दिली. प्रत्येक कामावर स्थगिती देत सुटलेलं सरकार, असं या सरकारचं वर्णन करावं लागेल. महाराष्ट्रात कोरोनाचा हैदोस झाला. संपूर्ण भारतात महाराष्ट्रात कोरोनाचा वेग जास्त होता. कोरोना परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरलं असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

ही बातमी पण वाचा : संजय राऊतांचा ईडी, सीबीआयवर निशाणा ; व्यंगचित्र ट्वीट करत अप्रत्यक्ष भाजपवर टीकास्त्र 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER