जुलै, ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट? राजेश टोपेंचे मोठे विधान

Rajesh Tope Corona

मुंबई :- राज्य सरकारने सध्या कोरोनाच्या (Corona) वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेला लॉकडाऊन १५ मेपर्यंत वाढवला आहे. यासंदर्भात आदेश काढण्यात आला असून त्यानुसार आता राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. तसेच देशात पुढच्या काही महिन्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाटदेखील येण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) उपस्थितीत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत सर्व जिल्ह्यांतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर टोपे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. या चर्चेत ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या प्लांटला परवानगी देण्यात आल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं.

आज सविस्तर तीन तास झालेल्या चर्चेत जे महत्त्वाचे निर्णय झाले त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ऑक्सिजन संदर्भात, अत्यंत काटकसरीने ऑक्सिजनचा वापर करणे, म्हणजेच प्रत्येक रुग्णालयाने ऑक्सिजन  ऑडिट हे केलं पाहिजे. काही यशोगाथा या महाराष्ट्रातील आहेत तर काही इतर राज्यातील आहेत तर त्यांचं अनुकरण केलं पाहिजे. लिकेजेसची दर चार -पाच तासांनी तपासणी केली पाहिजे, असंदेखील त्यांनी यावेळी सांगितलं.

कोरोनाची तिसरी लाट कदाचित जुलै, ऑगस्टमध्ये अपेक्षित आहे. त्याआधी आपण ऑक्सिजनबाबत परिपूर्ण असलं पाहिजे. तिसऱ्या लाटेआधी ऑक्सिजन नाही हे ऐकून घेतलं जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे योग्य उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

राज्याला सध्या १,७१५ टन ऑक्सिजन लागत आहे. तेवढं पूर्ण ऑक्सिजन पुरवलं जात आहे. रेमडेसिवीरचा वापर मर्यादित प्रमाणात करा. आज १० ते १५ हजार इंजेक्शन गरजेपेक्षा कमी पडत आहे. पण त्याचा अनावश्यक वापर करून रुग्णांवर परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी सूचना आढावा बैठकीत देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : गेल्या २४ तासात राज्यात ६६ हजार १५९ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button