दीक्षाभूमीवरून राष्ट्रवादीच्या ‘शिवस्वराज्य’ यात्रेच्या तिसऱ्या टप्याला सुरुवात

Shiva Swarajya Yatra

नागपूर :- पुरोगामी विचारांचा आदर्श ठेवून शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही राज्य करु असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिले. शिवस्वराज्य यात्रेतील तिसरा टप्पा विदर्भात असून याची सुरुवात आज दीक्षाभूमी येथून झाली. यावेळी जयंत पाटील बोलत होते.

शिवस्वराज्य यात्रेतील तिसरा टप्पा विदर्भात असून आज नागपुरात प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आपल्या सहकार्यांसह दिक्षाभूमीवर जावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलशाला वंदन केले. दीक्षाभूमी स्तूपात बुध्द वंदना घेण्यात आली. आमदार प्रकाश गजभिये यांनी प्रदेशाध्याक्ष जयंत पाटीलसह सर्व मान्यवरांचे शाॅल व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

आज दिक्षाभूमीतून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील सर्व वंचित घटकांना राष्ट्रवादी व काँग्रेससोबत येण्याची प्रेरणा मिळू दे असे विचार संविधानकर्त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर जयंत पाटील यांनी व्यक्त केले. वंचित समाजासाठीच काम करु. त्यात वंचित घटकांना समान उत्तम न्याय देवू असा आत्मविश्वासही प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केला.

आमच्या पक्षातील लोक सेना-भाजपात जात आहेत, परंतु सेना- भाजपात गेली तीन-चार वर्षे निवडणूक लढवण्याकरीता काम करत आहेत, असे लोक दुखावले आहेत. ते लोक माझ्या संपर्कात आहेत. त्यांची नावे जाहीर करणार नाही. कारण मुख्यमंत्री साम-दाम-दंड भेदाचे सुत्र वापरण्यात माहीर आहेत. त्यामुळे योग्यवेळी नावे जाहीर करु असेही पाटील यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.

यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आ. प्रकाश गजभिये, माजी मंत्री अनिल देशमुख, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, हिंगणा विधानसभेचे नेते संतोष नरवाडे, विजय गजभिये, जिल्हा कार्याध्यक्ष राजू राऊत, महिला शहराध्यक्ष अलका कांबळे, दिनकर वानखेडे, जिल्हा वक्ता सेलचे अध्यक्ष विलास कांबळे, विद्यार्थी प्रदेश सरचिटणिस पवन राऊत, संतोष पाठक आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.