दोघांतील तिसरा पाहुणा : आनंदाचे केंद्र की वादाचा विषय ?

दोघातील तिसरा पाहुणा

मीनल-अभिराम (Minal-Abhiram). एकमेकांमध्ये गुंग असलेले एक नवविवाहित जोडपे (married couple ) . फिरणे, मुव्हीला जाणे, गाड्यांवर चटक-मटक खाणे, हॉटेलमध्ये जाणे ,गप्पाटप्पा यात गुंतलेले असायचे. मीनल दोन दिवस माहेरी गेली की अभिरामला करमत नसे, खरं म्हणजे आवडतच नसे . तर अभिरामलाही ऑफिसमध्ये उशीर झाला की मीनलची कुरकुर सुरू होई. सुरुवातीच्या दिवसांमध्ये अभिरामचे मन जिंकण्यासाठी, सासरी एकरूप होण्यासाठी मीनल त्याच्याभोवती घोटाळत राही .आणि अभिरामही तिला खूश करण्यासाठी वेगवेगळ्या भेटवस्तू घेऊन येत असे. त्यातच घरात नव्या बाळाची (New born Baby), तिसऱ्या पाहुण्याची चाहूल लागली.

मीनलला होणारा प्रेग्नेंसीचा (Pregnancy) त्रास, नंतर बाळाचा जन्म ,त्याचं सगळं करण्यातच तिचा वेळ जाऊ लागला. जसजसे बाळ मोठे होत होते तेव्हा त्याच्याकडे लक्षही जास्त द्यावे लागत असे. नोकरीमुळे त्याला पाळणाघरात सोडण्याची तयारी ,आपले आवरणे, घरातले स्वयंपाकपाणी ,टिफिन भरून घेणे यात ती बिझी होऊ लागली. परत आल्यावर त्याला पुरेसा वेळ देता येत नाही म्हणून त्याच्याबरोबर वेळ घालवणे, त्याच्याशी खेळणे, खाऊ घालणे यावर मीनल जास्त वेळ घालवीत असे. आपोआपच त्या दोघांचा म्हणून आता काही वेळ राहात नव्हता.

अभिरामचीही नोकरीत बढती, वाढणारा कामाचा पसारा , त्यामुळे येणारा स्ट्रेस, यामुळे घरी आल्यावर मीनलने त्याची चांगली ,म्हणजे पूर्वीसारखी दखल घ्यावी, गप्पा कराव्या ,आपले मन मोकळे करण्यासाठी ती एक आपल्याला हक्काची जागा असावी ,असे त्याला वाटायचे. आणि त्यामुळे त्याची कुरकुर सुरू झाली .पूर्वी घरात वडिलांना कसा मान होता आता तर मी घरामध्ये अगदीच ‘दुर्लक्षित’ झालोय असं त्याला वाटू लागलं. मीनललाही या कशाची सवय नव्हती… त्यातून त्याच्याबरोबर वेळ घालवता येत नव्हताच, उलट मीनलला वाटायचं की, तिचा स्वयंपाक होईस्तोवर, त्याने मुलाशी खेळावे . तिला घरकामात मदत करावी. म्हणजे एकटीवर ताण येणार नाही. त्यामुळे तिची चिडचिड होणार नाही. खरं तर हा प्रश्न बरेच ठिकाणी येताना दिसतो .नव्याची नवलाई संपल्यावर सुरू होतात त्या अपेक्षा.

आणि तेव्हाच जर तिसऱ्या पाहुण्या बाळाचे आगमन झाले तर या प्रश्नाचा टार्गेट ठरतो ते छोटंसं बाळ ! खरं तर हा टप्पा दोघांच्याही दृष्टीने एक आनंददायी सोहळा असतो. संसाराची ही एक गोड सुरुवात असते .आणि प्रेमाची नवीन रीत असते. याचा आनंद दोघांनी मिळून घ्यायचा असतो. खरं तर बाळ होऊ देण्याचा निर्णय घेताना या सगळ्याचा विचार झालेला असतो .असायला हवा. पण बरेचदा विचार आणि प्रत्यक्ष अनुभव यात तफावत जास्त जाणवते. म्हणजेच काय तर वास्तविकतेतून त्याचा विचार केलेला नसतो. खरे तर बाळाची काळजी घेताना, तिच्या नवऱ्यावर प्रेम कमी होत नाही. उलट स्त्रिया करिअर सांभाळून मुलांकडे पाहतात .त्यामुळे मनात असणारा अपराधी भाव घालवण्यासाठी घरी आल्यावर मुलांना जास्त वेळ देऊन, त्याच्याबरोबर घालवतात. अशा परिस्थितीत बरेचदा नवऱ्याची विचारपूस, आवडीनिवडी जपणे अशा अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही.

बरेचदा तोही त्याच्या करिअर ,प्रमोशन, चांगला जॉब, व्यवसाय यात इतका गुंततो की, यावेळी लहान बाळ दोघांचे आहे. त्याच्या विकासात आपला हातभार एक चांगला बाबा म्हणून हवा आहे. हे तर तो विसरतो; पण त्याबरोबरच याच काळामध्ये बायकोलाही आपल्या मदतीची खूप गरज आहे हे समजून घेण्याचीही खूप गरज आहे ,याचे भान त्याला राहात नाही. त्यामुळे तिसर्‍याचा प्रवेश दोघांनाही सुखकर वाटेनासा होतो. खरे तर लग्नानंतरचे काही दिवस नव्याची नवलाई असते. पण कायमच २४ तास एकमेकात गुंतणे, एकमेकांशी डोके लावणे हे खरे तर एकमेकांच्या प्रगतीला खीळ घालणारे असू शकते, समोरच्याला त्याचे हक्काचे काही क्षण लागतात हे विसरून समोरच्याच्या हक्कांवर गदा आणणारे असते. असा सहवास नकोसा व कंटाळावाणाही होऊ शकतो.

म्हणूनच परस्परांबद्दलचा हा ‘पझेसिव्हनेस’ दूर करायला हवा ही गोष्ट दोघांनी समजून घ्यायला हवी. बाळाचा जन्म ही संसाराची सुरुवात आहे. सर्वात शेवटचे साध्य नाही. सहजीवनाचा गोडवा येथून पुढे वाढायला सुरुवात होते. म्हणूनच बाळाचा निर्णय घेताना दोघांनीही आर्थिक, शारीरिक तयारीबरोबरच मानसिक व भावनिक विकासही स्वतःचा घडवायला हवा. प्राधान्यक्रम आता बदलणार आहे ते स्वीकारावे लागेल. पती आणि बाबा, आई आणि पत्नी या भूमिका निभावताना सीमारेषा निश्चित कराव्या म्हणजे नात्यांमध्ये गल्लत होत नाही.

मुलाचे संगोपन आणि शिस्त लावताना दोघांचाही सहभाग आवश्यक असल्याची जाणीव हवीच.आता प्रेमाची, ते व्यक्त करण्याची केवळ परिभाषा बदलत असते, पद्धत बदलते. न सांगता एखादी गोष्ट समजून घेऊन करणे , काळजी घेणे, मनातलं जाणणे, आश्वासक आधार असे सहजीवनाचे संदर्भ बदलत असतात. बरेचदा सगळ्या गोष्टी एकत्र करणे आता जमणार नसते. हे स्वीकारून जबाबदाऱ्या वाटून घेता येतात आणि असे दूर असल्यामुळे, एकमेकांच्या सहवासाचे क्षण शोधणे दोघांनाही गरजेचे वाटते. बऱ्याच स्त्रिया अशा नव्या वळणांवर स्वयंकेंद्री बनतात, स्वतःचा विचार करणे, स्वतःच्या आरोग्याचा विचार करणे, स्वतःमध्येच रमणे इत्यादी.

पण सगळ्या विचार व भावनांचे शेअरिंग असेल तर त्याच्यातही एकटेपणाची भावना येणार नाही, त्याचे मूडस,त्याच्या अपेक्षा जाणून घेण्याची कुवत मुळातच स्त्रीमध्ये असते. त्याचा वापर फक्त करा. वाढीच्या प्रक्रियेमध्ये आई आणि बाबा दोघांचाही सहवास असणे हे छोट्या बाळाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते. आज विभक्त कुटुंब पद्धतीत तसंही मुलांना आईबाबांव्यतिरिक्त कोणीही दिसत नाही. मूल जितक्या जास्त लोकांच्या सहवासात वाढेल तितकी त्याची प्रगती जास्त होते. तेव्हा आईबाबांनी स्वतःपलीकडे जाऊन बाळ ही आपली प्राथमिकता ठरवून त्याचे संगोपन करावे.

ही बातमी पण वाचा : कोरोना काळातील बालपण — ” आणि हे सहजतेने साध्य करू या!”

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER