तिसरे अपत्य ‘दडविल्या’बद्दल महिला कारागृह अधीक्षक बडतर्फ

Maharashtra Civil Services Small Family Rule
Representative Image
  • लबाडीने मिळविलेली नोकरी नऊ वर्षांनी गमावली

मुंबई : प्रत्यक्षात तीन अपत्ये असूनही आपल्याला दोनच अपत्ये आहेत अशी खोटी माहिती देऊन लबाडीने नोकरी मिळविल्याबद्दल महाराष्ट्र सरकारने पुणे येथील जिल्हा कारागृहाच्या (वर्ग-२) अधीक्षिका स्वाती जोगदंड यांना सेवेतून बडतर्फ केले आहे.

राज्य सरकारने आपल्या कर्मचार्‍यांसाठी ‘छोट्या कुटुंबा’चे (जास्तीत जास्त दोन अपत्ये) निकष सक्तीचे केले आहेत. दोनपेक्षा जास्त अपत्ये असलेली व्यक्ती राज्य सकारच्या नोकरीसाठी अपात्र मानली जाते. यासाठी सन २००५ हे वर्ष ‘कट ऑफ इयर’ ठरविण्यात आले आहे.नोकरीस लागणार्‍या व नोकरीत असलेल्या प्रत्येक कर्मचार्‍यास आपल्या अपत्यांची माहिती विहीत नमुन्यातील अर्जात सत्यप्रतिज्ञेवर भरून द्यावी लागते. यासाठी ‘महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस (स्मॉल फॅमिली )रुल्स’ ही नियमावलीही तयार करण्यात आली आहे.

स्वाती जोगदंड या सन २०१२ मध्ये राज्याच्या कारागृह सेवेत रुजू झाल्या. त्यावेळी त्या विवाहित होत्या व त्यांना दोन मुली व एक मुलगा अशी एकूण तीन अपत्ये होती. त्यापैकी शेवटचे व तिसरे अपत्य २९ एप्रिल, २००७ रोजी जन्मलेले होते.

असे असूनही जोगदंड यांनी सन डिसेंबर २०१५ मध्ये त्यांच्या अपत्यासंबंधीचे जे सत्यापित निवेदन सरकारला सादर केले त्यात त्यांनी आपल्याला फक्त दोन मुली असल्याची खोटी माहिती दिली. सन २०१६ मध्ये जोगदंड यांनी खोटी माहिती दिल्याची तक्रार सरकारला प्राप्त झाली. त्यावरून जोगदंड यांच्याविरुद्ध खातेनिहाय चौकशी करण्यात आली. जोगदंड यांना नोकरीला लागल्या तेव्हाच तीन अपत्ये होती व त्यामुळे त्या नोकरीस अपात्र होत्या. पण त्यांनी नोकरी मिळविण्यासाठी दोनच अपत्ये असल्याची खोटी माहिती देऊन सरकारची फसवणूक केली, असे चौकशीतून निष्पन्न झाले. जोगदंड यांनी नोकरीच मुळात लबाडीने मिळविलेली असल्याने त्यांना नोकरीतून बडतर्फ केले गेले.

चौकशीच्या अहवालासह बडतर्फीचा आदेश जोगदंड यांच्यावर बजावण्यात आला. आपली चूक क्षमापित करावी व  नियम शिथिल करून आपल्याला नोकरीत ठेवावे, अशी विनंती जोगदंड यांनी केली. परंतु नियमात तशी तरतूद नसल्याने व तसे करण्याचे  कोणतेही सबळ कारण नसल्याने त्यांची ती विनंती अमान्य करण्यात आली.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button