
सिंधुदुर्ग : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत भाजपचे (BJP) खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी मोठे विधान केले आहे. मी यापूर्वी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे. ही मागणी मान्य होणार असून आता लवकरच ठाकरे सरकारचं (Thackeray Government) विसर्जन होणार आहे, असा दावा नारायण राणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. तसेच याबाबतची मागणी उद्या पुन्हा संसदेतही करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना राणे यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना लक्ष्य केले. सचिन वाझे हे मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत होते. वाझेसारख्या एपीआयच्या अनेक वेगवेगळ्या गाड्या आढळल्या असतील तर त्याच्या बाकीच्या संपत्तीचीही चौकशी व्हायची आहे. अशा माणसाला पाठीशी घातले जाऊ नये. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. उद्धव ठाकरे यांचं सरकार सगळ्या विषयात अपयशी ठरलं आहे. पोलीस खात्यात कुंपणच शेत खातंय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप राणे यांनी केला.
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांची गाडी आढळल्यानंतर त्या ठिकाणी सचिन वाझे पहिले पोहचले होते. मनसुख हिरन (Mansukh Hiren) आणि सचिन वाझे (Sachin Vaze) यांचे संबध असल्याचे बाहेर आल्यावर मनसुखची हत्या करण्यात आली. सचिन वाझेंनी ही हत्या केल्याचा आरोप मनसुखच्या पत्नीने केला तरी मुख्यमंत्र्यांनी त्याला पाठीशी घातलं, असे नमूद करताना सचिन वाझे पोलीस आयुक्तांपेक्षा मोठा आहे का?, असा सवाल राणे यांनी केला. मनसुख हिरन प्रकरणात सचिन वाझे यांना अटक होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले, असा आरोपही राणे यांनी केला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला