युवकांना लसीपासून वंचित ठेवणारे ठाकरे सरकार ‘युवाविरोधी’; भाजपचा हल्लाबोल

Keshav Upadhye & Uddhav Thackeray

मुंबई :- येत्या १ मेपासून राज्यभरात १८वर्षांवरील सर्वांनाच कोरोना प्रतिबंध लस देण्याची घोषणा ठाकरे सरकारने केली. मात्र त्यासाठीचे नियोजन होताना दिसून येत नाही. ठाकरे सरकारने १ मेपासून कोरोना लसींच्या (Coronavirus Vaccine) तुटवड्यामुळे सर्वांचे लसीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि याच मुद्द्यावरून भाजपने ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. युवकांना लसीपासून वंचित ठेवणारे ठाकरे सरकार (Thackeray Government) युवाविरोधी असल्याची टीका भाजपचे (BJP) प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

आरक्षणाचा गोंधळ, परीक्षांचा बट्ट्याबोळ यानंतर आता राज्यातील युवाविरोधी ठाकरे सरकारने, देशातील इतर राज्यातील युवक १ मेपासून लस घेत असताना धोरणाअभावी राज्यातील तरुणाला लसीकरणापासून वंचित ठेवले आहे. १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना मोफत लस देणार अशी माध्यमामध्ये हवा निर्माण करणारे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार दिशाहीनतेने पुन्हा एकदा तोंडघशी पडलेले आहे, अशी खरमरीत टीका उपाध्ये यांनी केली आहे.

लसीच्या तुटवड्याअभावी १ मेपासून लसीकरण मोहीम सुरू करता येणार नसल्याचे कारण देत आहे. जर राज्य सरकारकडे १८ वर्षापुढील सर्वांना लस मिळावी, अशी मागणी केली तर त्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी का नाही केली? लसी कशा प्रकारे उपलब्ध करणार, त्याचे वितरण, कोणत्या देशाची किंवा कंपनीकडून लस खरेदी करणार आहोत, त्याची किंमत, ती कधीपर्यंत उपलब्ध होईल, अशी प्राथमिक बोलणी करणे आवश्यक नव्हते का? राज्याचे स्वत:चे नियोजन आराखडा काय? केवळ केंद्राकडे मागण्या करायच्या आणि परवानगी दिल्यावर आता कार्यवाहीला वेळ लागेल, असे निमित्त देऊन जनतेला ताटकळत ठेवायचे. मात्र, राज्य सरकारचा बोलघेवडेपणा उघडा पडला आहे. आसाम, गोव्यासारख्या राज्यांनी लसीची मागणी नोंदवत असताना मात्र इथे निव्वळ घोषणाबाजी सुरू होती. मग पुन्हा नवीन कोणत्या तरी मागणीसाठी रडत बसायचे हेच या सरकारचे धोरण आहे, अशा  शब्दांत उपाध्ये यांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button