दोन आयुर्धांची चाचणी यशस्वी

पोखरण : भारताने रविवारी राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये हेलिकॉप्टरवरुन डागता येणाऱ्या रणगाडा विरोधी हेलिना क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हेलिना हे संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र आहे. यामुळे भारतीय संरक्षण दलांची मारक क्षमता कैकपटीने वाढणार आहे.

या सोबतच जैसमलेरच्या चंदन रेंजवर भारतीय हवाई दलाच्या फायटर विमानातून गाईडेड बॉम्बची घेण्यात आलेली चाचणीही यशस्वी ठरली.

या गाईडेड बॉम्बची निर्मितीही संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान वापरुन करण्यात आली आहे. चीन-पाकिस्तानविरोेधात मोक्याच्या क्षणी ही दोन्ही अस्त्र महत्वपूर्ण ठरू शकतात.

‘हेलिना’ने अचूकतेने आपले लक्ष्य भेदले. टेलिमेंट्री स्टेशनमधून या क्षेपणास्त्राच्या संपूर्ण प्रवासावर लक्ष ठेवण्यात आले होते. हेलिना क्षेपणास्त्रामधील इन्फ्रारेड इमेजिंग सीकर या सिस्टिमने लक्ष्यभेदासाठी मार्गदर्शन केले. सध्या हे जगातील सर्वात अत्याधुनिक रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आहे.

डीआरडीओचे आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी या चाचणीच्यावेळी उपस्थित होते. राकेश मंत्री आणि निर्मला सीतारमण यांनी दोन्ही यशस्वी चाचण्यांबद्दल डीआरडीओच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे. या अस्त्रांमुळे भारतीय सैन्यदलांची ताकत मोठया प्रमाणात वाढेल. ४ जूनला डीआरडीओने ओदिशाच्या डॉक्टर अब्दुल कलाम बेटावरुन लांब पल्ल्याच्या अग्नि-५ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. अग्नि-५ क्षेपणास्त्राची ती सहावी चाचणी होती.

ही बातमी पण वाचा : ओडिशा येथील बेटावरून अग्नी 2 ची क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

ही बातमी पण वाचा : अग्नी ५’ ची यशस्वी चाचणी, चीन भारताच्या टप्प्यात