आस्तादने स्वप्नालीला दिली गाण्यातून हाक

Swapnali

सेलिब्रिटी असले म्हणून काय झालं त्यांच्या डोळ्यात येणारं पाणी हे ग्लिसरीन घालूनच आलेलं असतं असं काही नाही. जरी ते एखादी कला सादर करण्यासाठी स्टेजवर उभे असले तरी आतून आलेली भावनाही अगदी खरीखुरी असते आणि मग त्यातून जेव्हा डोळे पाणावतात ते अश्रू, विरह, दुरावा, आठवण अशा भावनांमधून आलेले असतात. रियालिटी शोच्या मंचावर आस्तादने याची प्रचिती दिली. त्याचं गाणं ऐकताना भारावलेले परीक्षकदेखील गाणं संपल्यानंतर आस्तादचे (Astad Kale) ओलावले डोळे पाहून भावुक झाले. आणि हे सगळं होतं बायको स्वप्नाली हिच्यासाठी हे जेव्हा त्यानं सांगितलं तेव्हा ‘नसतेस घरी तू जेव्हा’ हे गाणं केवळ गाणं होतं, एक मनापासून घातलेली साद बनलं. गेल्याच आठवड्यात डांसिंग स्टार या रियालिटी शोमध्ये नवरात्री स्पेशल हा विशेष सेगमेंट झाला. यानिमित्ताने महिलांचे महत्त्व अधोरेखित करणारी गाणी स्पर्धकांनी गायली. या कार्यक्रमात आस्ताद काळे हादेखील एक स्पर्धक सेलिब्रिटी म्हणून सहभागी झाला आहे . त्याने सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं आणि संदीप खरे यांच्या लेखणीतून उतरलेलं ‘नसतेस घरी तू जेव्हा’ हे गाणं गायचं ठरवलं.

आस्ताद मंचावर आला, म्युझिक पीस लागला आणि आस्तादनेही गाण्याला सूर दिला. अर्थात हे गाणं मुळात असं आहे की, जेव्हा बायको काही कारणाने नवऱ्यापासून लांब जाते, तो विरह नवर्‍याला अनेक गोष्टींची उणीव करून देणारा असतो. ती घरी नसते तेव्हा कशा कशा पद्धतीने जीव तुटका होतो, सगळं नीरस वाटायला लागतं, अशा आशयाचं हे गाणं अनेक पुरुषांनी त्यांच्या आयुष्यात अनुभवलं असेल. बायको आसपास असते तेव्हा तिचं काहीच वाटत नाही; मात्र ती जेव्हा नसते तेव्हा तिचं असणं जास्त प्रकर्षानं जाणवतं हे सगळे भाव आस्तादने आपल्या गाण्यातून व्यक्त केले. हे गाणं गाऊन संपलं तेव्हा परीक्षक बेला शेंडे हिने आस्तादचे कौतुक केले; मात्र शेवटी ती असं म्हणाली की हे गाणं कुठे तरी आतून आलेलं होतं. बेलाचे हे शब्द ऐकून आस्ताद हेलावून गेला. ते त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होतं.

परीक्षक प्रशांत दामले यांच्याकडूनही अशी भावनिक कमेंट मिळाल्यानंतर आस्तादला त्याच्या भावना रोखता आल्या नाहीत. तो म्हणाला, महिनाभरापूर्वी माझं आणि स्वप्नालीचं थोडं भांडण झालं. ती रागारागात तिच्या घरी निघून गेली. ती अजूनही घरी परत आलेली नाही. असे म्हणून त्यांनी प्रशांत दामले यांना मिठी मारली. सिंगिंग स्टार, सेलिब्रिटीची
झूल उतरून आस्ताद त्या वेळेला फक्त आणि फक्त स्वप्नालीचा नवरा म्हणून प्रशांत दामले यांच्या मिठीत शिरला आणि स्वप्नालीची वाट पाहतोय आणि म्हणूनच कदाचित हे गाणं आतून आल्यासारखं तुम्हाला वाटलं असेल. तर या माझ्या खऱ्या खऱ्या भावना आहेत. स्वप्नाली गेल्या काही दिवसांपासून माझ्यासोबत नाही. माझ्या घरी नाही आणि त्यामुळे त्या गाण्याप्रमाणेच माझं आयुष्य हे उसवलेल्या धाग्यासारखं झालं आहे, असं म्हणून त्यानं स्वप्नालीला अप्रत्यक्षरीत्या परत येण्यासाठी हाक दिली. बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्ये आस्ताद दिसला होता . त्या वेळेला खरे तर त्याच्यावर एका टास्कमध्ये बिग बॉसच्या घरातील व्हिलन कोण वाटतंय, या प्रश्नावर सर्वाधिक सदस्यांनी आस्तादकडे बोट दाखवलं होतं.

आस्तादचा स्वभाव स्पष्ट आणि फटकळ असल्यामुळे कदाचित तो इतर सदस्यांना व्हिलन वाटला असेल; पण बायको स्वप्नालीसाठी मला नेहमीच हिरो राहायचे आहे, असे तो म्हणतो. स्वप्नाली आणि आस्ताद यांची ओळख ‘पुढचं पाऊल’ या मालिकेत झाली होती. खरं तर या मालिकेमध्ये आस्ताद आणि स्वप्नाली यांनी दीर-भावजय अशा भूमिका केल्या होत्या. या मालिकेत त्यांचे प्रेम जुळले आणि स्वप्नालीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची घोषणा आस्तादने बिग बॉसच्या घरात केली होती. स्वप्नालीदेखील अभिनेत्री असून तिनेदेखील आजपर्यंत विविध मालिका, सिनेमांमध्ये काम केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER