मेलबोर्नच्या विजयाची ‘गोडी’ काही वेगळीच!

Ajinkya Rahane - Melbourne

भारतीय क्रिकेट (Indian Cricket team) संघाने काही पहिल्यांदाच विजय मिळवला नाही. आतापर्यंत भरपूर सामने जिंकले आहेत; पण मेलबोर्नच्या (Melbourne test) विजयाची गोडी काही वेगळीच आहे. का? कशासाठी? तर या
सामन्यामागची पार्श्वभूमी…आदल्याच सामन्यात हा संघ अवघ्या ३६ धावांत गुंडाळला गेलेला होता. लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागलेला. नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतलेला. मोहम्मद शामीसारखा हुकमी गोलंदाज जायबंदी झालेला. त्यात भर उमेश यादवच्या जायबंदी होण्याची पडलेली.

ईशांत शर्मा तर उपलब्धच नव्हता. रोहित शर्माही नव्हता. कोहली नाही, रोहित नाही, शामीसुद्धा नाही… तरी १० दिवसांपूर्वीच ३६ धावांत बाद झालेल्या भारताने हा सामना जिंकला हे अविश्वसनीयच. म्हणूनच या विजयाची बातच काही और म्हणावी लागेल. १९७४ मध्ये आपला संघ ४२ धावांत बाद झाला होता.  त्या वेळी पुढचा सामनासुद्धा आपण एका डावाने गमावला होता. कारण एवढ्या मोठ्या अपयशाच्या धक्क्यातून सावरायला वेळ लागत असतो; पण अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) प्रभावी नेतृत्वात आपल्या संघाने अशक्य वाटणारे ते करून दाखवले म्हणून या विजयाची गोडी अधिक! सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गजानेसुद्धा  म्हटलेय की विराट, रोहित, ईशांत व शामीशिवाय कसोटी सामना जिंकणे ही फार मोठी कामगिरी आहे.

भारतीय संघाने मारलेली उसळी व दाखवलेली लढावू वृत्ती कौतुकास्पद आहे, असे मास्टर ब्लास्टरने म्हटले आहे. नियमित कर्णधार विराट कोहलीनेसुद्धा म्हटलेय की, काय विजय आहे हा! संपूर्ण संघाची कामगिरी भन्नाट झाली. या संघासाठी आणि विशेषतः जिंक्ससाठी (अजिंक्य रहाणे) मी अतिशय आनंदी आहे. ‘जिंक्स’ने केलेले नेतृत्व अफलातून आहे. येथून पुढचा प्रवास प्रगतीचा आणि केवळ वरच्याच दिशेने आहे. विराटने पुढच्या प्रवासाची व्यक्त केलेली ही आशा फलद्रूप होते का, हे पुढच्या तीन आठवड्यांत कळेलच; पण एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली  की, आताचा हा भारतीय संघ कुण्या एक-दोन खेळाडूंवर अवलंबून राहिलेला नाही.

मोठमोठे दिग्गज संघात असोत वा नसोत, त्यांची जागा घेणारे खेळाडू आणि तशी प्रतिभा भारतीय क्रिकेटमध्ये आहे. नेतृत्वातही अजिंक्य हा आता अतिशय सक्षम पर्याय बनून समोर आलेला आहे. आकाश चोप्राने तर शुभमान गिलचे वर्णन भारतीय फलंदाजीचा भावी सुपरस्टार असे केलेय. एरवी निराशाजनकच ठरलेल्या २०२० चा हा शेवट भारतीय क्रिकेटसाठी फारच आशादायी आहे. ऑस्ट्रेलियन (Australia) शेपटाने काही काळ त्रास दिला खरा; पण मोकळेपणाने ते कधीच खेळू शकले नाही. १०४ षटकांत २०० धावा, फक्त १० चौकार आणि सामन्यात एकही अर्धशतकी खेळी नाही, असे ऑस्ट्रेलियासाठी कित्येक वर्षांत प्रथमच घडले. १९८६ नंतरची त्यांची ही सर्वांत धिमी धावगती ठरली. १९८८ नंतर पहिल्यांदाच घरच्या मैदानावर सामना असूनही त्यांचा एकही फलंदाज सामन्यात अर्धशतक करू शकला नाही.

चांगला खेळणारा ग्रीन अर्धशतक करेल असे वाटत असतानाच सिराजने हा मोहरा टिपला आणि यजमानांचा प्रतिकार आटोपला. मयंक अगरवाल व चेतेश्वर पुजाराच्या लवकर बाद होण्याने काही काळ चिंतेचे वातावरण केले होते; पण शुभमान गिलने दोन चौकार लगावून त्याचा काही परिणाम होणार नसल्याचे दाखवून दिले आणि रहाणेने त्याचे ‘अजिंक्य’ हे नाव सार्थ ठरवले. ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन यानेसुद्धा भारताचे वर्चस्व मान्य करताना त्यांनी आम्हाला चुका करण्यास  भाग पाडले हे कबूल केले. आपल्या गोलंदाजांचे तर त्यानेही कौतुक केले. तो म्हणाला की, त्यांचा सामना करायची आम्ही पाहिजे तशी तयारीच केलेली नव्हती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER