टीआरपीचा बोलबाला..

Star Pravah

मराठी मालिका आणि त्यांचं टीआरपी यांचं एक अनोखं नातं आहे. नुकत्याच आलेल्या एका सर्व्ह मधून ” स्टार प्रवाह ” ही वहिनी टीआरपीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे हे समजलं. मराठी मालिका या प्रेक्षकांना नेहमीच भावतात म्हणून त्यांचा विषय हा वेगळाच असतो. अनेक मालिका या प्रेक्षकांना त्यांचा कथा मधून आपलंसं करून घेतात.

नवनवीन मालिका, प्रेक्षकांना भावेल अशी रंजकता यामुळे सगळ्याच मालिका लोकप्रिय ठरत आहेत. ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतील किशोरी अंबिये यांनी साकारलेले ‘मामी’ हे पात्र अगदीच उठावदार ठरते आहे. ‘ढवळून टाकीन’ या त्यांच्या ब्रीदवाक्याचा प्रयोग त्यांच्यावरच होणार असल्याचे दृश्य या आठवडय़ात पाहायला मिळेल. सरिता आणि तिच्या कुटुंबात कलह कसा होईल यासाठी नेहमीच प्रयत्न करणारी मामी, आपली मुलगी आता त्या घरची सून आहे याचा जराही विचार न करता तिच्या कुटुंबात फूट पाडण्याचे प्रयत्न अखंड करते आहे. हीच कारस्थाने तिच्या लेकीसमोर म्हणजे अंजीसमोर आता उघड होतील त्यामुळे अंजी आपल्या आईला ढवळून टाकणार का हे आगामी भागात कळेल. तर महिला वर्गाच्या विशेष पसंतीस उतरलेल्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत पतीने केलेल्या फसवणुकीनंतर आई काय भूमिका घेणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. पण खचून न जाता खंबीर झालेली अरुंधती अनिरुद्धलाच नाही तर संजनालाही जाब विचारायला तिच्यासमोर उभी ठाकणार आहे. त्यामुळे आगामी भागात येणारे आईचे ‘सक्षमीकरण’ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल यात शंका नाही. तर ‘वैजू नंबर वन’ या मालिकेत धनंजय माने हे मराठी सिनेमातले अजरामर पात्र प्रवेशणार आहे. अभिजीत चव्हाण हे पात्र साकारत असून आनंद इंगळे आणि सुहास परांजपे हे पाहुणे कलाकार धुडगूस घालण्यासाठी येणार आहेत.

तरुणांचा वावर असलेली मालिका कायमच पसंतीस उतरत असते. मग ती ‘एका लग्नाची गोष्ट’ असो, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ असो. ‘झी मराठी’ने अशा प्रेमकथांना कायमच दुजोरा दिला आहे. सध्या सुरू असलेली ‘माझा होशील ना’ ही मालिकाही अशीच गाजते आहे. आदित्य आणि सई यांचा प्रेमप्रवास मैत्रीतून प्रेमाच्या वाटेकडे चालला आहे. मध्ये सईची आई गतिरोधक म्हणून उभी आहे खरी पण हेही दिवस जातील. सईचा राग घालवण्यासाठी आदित्यने तिला रातराणीचे कानातले दिले आहेत. पण सईची आई त्यांना कचऱ्याचा डबा दाखवते. अशातच आदित्यला आपल्या आईवडिलांचा भूतकाळ मामांकडून समजतो. आगामी भागात आदित्यला आपल्या आईवडिलांच्या समृद्ध वारशाचा आणि सईला रातराणीचा शोध लागणार आहे. तर ‘अगं बाई सासूबाई’ या मालिकेत अभिजीत आणि आसावरीच्या नात्यातील तणाव काहीसा दूर होताना दिसेल. अभिजीतची तब्येत बरी नसल्याचे कळताच आसावरी तिथे पोहोचते आणि त्यांची काळजी घेते. त्यानंतर आजोबांची तब्येत बरी नसल्याने ती गावाला जाते. परंतु विक्रीसाठी ठेवलेल्या फराळाची जबाबदारी सोहमवर देऊन जाते. सोहम मात्र त्याची नासधूस करतो. आता हे प्रकरण शुभ्रा कशी निस्तरते हे कळेल.

‘कलर्स मराठी’वरही मालिका उत्कंठावर्धक टप्प्यांवर आहेत. एरव्ही संजीवनीला नजरेच्या धाकावर ठेवणाऱ्या आईसाहेब अचानक चाव्यांचा जुडगा संजीवनीकडे सोपवतात. अर्थात, संजीवनीच्या चांगुलपणामुळेच ही जबाबदारी तिच्याकडे येते. परंतु हे सगळे बदल हरखून टाकणारे आहेत. या मालिकेतील दादासाहेब पात्र पूर्वी अजय पुरकर साकारायचे, परंतु त्यांची एण्ट्री एका नव्या संगीत कार्यक्रमात झाल्याने या मालिकेतून त्यांनी रजा घेतली आहे. आता नवीन दादासाहेब आणि त्यांचा संन्यासी अवतार कथानकाला वेगळे वळण देणार आहे. दादासाहेबांच्या अशा रूपाला वैतागून घर सोडून चाललेल्या राजश्रीला थांबवण्यासाठी संजीवनी चाव्यांचा जुडगा राजश्रीकडे देतात. आता आईसाहेबांचा नुकताच जिंकलेला विश्वास संजीवनी गमावणार का हे मात्र लवकरच ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेत पाहायला मिळेल. तर ‘जीव झाला येडापीसा’ या मालिकेत सोनलवर झालेल्या अन्यायाचा सूड घेण्यासाठी सिद्धी मोहीम आखते आहे. एखाद्या अट्टल राजकारणीसारखी तिची वाटचाल प्रत्येकालाच मालिकेकडे ओढून घेणारी आहे. सरकार आणि आत्याबाई दोघांनाही गंडा घालून पत्रकारांसमोर सत्य बाहेर आणायची सिद्धीची युक्ती कशी यशस्वी होतेय यावरच पुढचे कथानक बेतलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER